अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
चार महिन्यांपासून प्रशासक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी 18 ऑगस्टला बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली होती. या यादीवर (दाखल ठरावावर) 238 हरकती आल्या होत्या. त्या सर्व हरकतींवर सुनावणी होऊन निकाली काढण्यात आल्या आहेत. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियोजनानुसार आज मंगळवार (दि.15) रोजी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर कोणत्याहीक्षणी निवडणूक जाहीर करण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बँक प्र्रशासनावतीने 5 हजार 890 हून अधिक मतदारांचे ठराव आणि नावे असणारी यादी सहकार विभाग तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवली होती. यातून बंद पडलेल्या, अवसायनात असणार्या आणि प्रशासक असणार्या संस्था वगळून निवडणूक निर्णय अधिकारी निकम यांनी 31 ऑगस्टला 3 हजार 677 मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली होती. या यादी प्रसिध्द करत असताना 366 संस्थेचे ठराव अपात्र ठरवले होते. जिल्हा बँकेच्या संचालकांची मुदत 20 फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. मात्र, मे महिन्यांत बँकेवर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर जून महिन्यात विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था (शेती पुरक मतदारसंघ) व बिगर शेती संस्था मतदारसंघ अशा संस्थाचे 16 जून ते 16 जुलैपर्यंत ठराव मागविण्यात आले. त्यानुसार निवडणूक अधिकारी यांच्याकडे जिल्हा बँकेने 5 हजार 890 सभासदांची (मतदारांची यादी) पाठवली होती.
यातून ठराव उपलब्ध झालेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थांचे 1 हजार 367, बिगर शेती मतदारसंघातून 1 हजार 595 तर शेती पुरक मतदारसंघातून 1 हजार 51 असे 4 हजार 13 संस्थांचे ठराव निवडणूक निर्णय अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात आले होते. यातून 366 ठराव अपात्र करण्यात आले होते. यात सोसायटी संस्थांचे 7, बिगर शेती मतदारसंघाचे 124 तर शेती पुरक मतदारसंघाचे 235 यांचा सामवेश होता. तर 233 संस्थांनी ठराव दिले नव्हते. त्यात विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थांचे 27, बिगर शेती मतदारसंघाचे 156 तर शेती पुरक मतदारसंघाचे 50 संस्थांचा समावेश होता. यामुळे बँकेच्या निवडणुकीसाठी सेवा सोसायटी मतदारसंघ, बिगरशेती मतदारसंघ आणि शेती पूरक मतदारसंघातून 3 हजार 647 आणि 30 व्यक्तीगत असे 3 हजार 677 मतदार निश्चित झाले होते.
प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप यादीवर 238 हरकती दाखल झाल्या होत्या. यात सर्वाधिक 123 हरकती एकट्या संगमनेर तालुुक्यातील होत्या. तर उर्वरित नेवासा 14, अकोले 14, पारनेर 10, जामखेड 7, कर्जत 10, श्रीगोंदा 12, नगर तालुका 12, राहुरी 3, श्रीरामपूर 5, राहाता 9, पाथर्डी 6, शेवगाव 4 कोपरगाव 9 यांचा समावेश होत्या. दाखल हरकतींवर 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरदरम्यान सुनावणी होवून त्या सर्व निकाली काढण्यात आल्या आहेत. त्यानंतर आज जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.
गत पंचवार्षिकला चार जागांवर निवडणूक
जिल्हा बँकेच्या गत पंचावार्षिकला फेबु्रवारी 2021 ला अवघ्या चार मतदारसंघासाठी निवडणूक झाली होती. त्यावेळी संचालक मंडळाच्या विविध मतदारसंघातील 17 जागा बिनविरोध निघाल्या होत्या. त्यावेळी निवडणुकीचा हत्ती गेल्यावर केवळ शेपटासाठी साठमारी झाली होती. जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अनेकांची इच्छा होती.
विखे विरोधात थोरात की विखे-थोरात विरोधात इतर..
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आजवर पारंपरिकरीत्या विखे गट विरुद्ध थोरात गट अशीच थेट लढत पाहायला मिळाली आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपनेते (स्व.) शिवाजीराव कर्डिले आणि कोल्हे गटाने ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी हातमिळवणी करत राजकीय गणिते बदलली होती. यंदाच्या निवडणुकीत नेमके कोण कोणासोबत युती करणार आणि कोण कोणाविरोधात ठाम उभे राहणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी विखे आणि थोरात गट एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तसे झाल्यास, विखे-थोरात यांच्या या संभाव्य युतीविरोधात जिल्ह्यातील इतर सर्व विरोधक एकवटणार का, की निवडणुकीच्या ऐनवेळी नवी राजकीय गणिते आकारास येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.




