अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत 21 संचालकांच्या जागांपैकी दोन जागा बिनविरोध झाल्या असून आणखी तीन जागांवर बिनविरोध निवडीची शक्यता निर्माण झाली आहे. नेवासा सेवा सोसायटी मतदार संघातून माजी मंत्री शंकरराव गडाख आणि संगमनेर सेवा सोसायटी मतदार संघातून काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजीतसिंह देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी एकच वैध उमेदवारी अर्ज राहिला आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 21 ऑक्टोबर असल्याने तोपर्यंत कोणत्या जागा बिनविरोध होतात आणि किती जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार, हे स्पष्ट होणार आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याने उमेदवारांची माघार घेण्यासाठी नेत्यांची कसोटी लागणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी बुधवारी (7 ऑक्टोबर) वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द केली. मंगळवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी तसेच हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर वैध अर्जांची यादी प्रसिध्द करण्यात आली. यामुळे निवडणुकीतील पुढील चित्र काही प्रमाणात स्पष्ट झाले आहे.
राहाता मतदारसंघात माजी खासदार डॉ. सुजय विखे आणि प्रवरा बँकेचे अध्यक्ष भास्कर निवृत्ती खर्डे यांचेच अर्ज शिल्लक आहेत. खर्डे हे विखे समर्थक असल्याने त्यांचा अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे विखे यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. विखे समर्थकांनी बुधवारी नगरमध्ये फटाके फोडून बिनविरोध निवडीचा आनंद साजरा केला. शेवगाव मतदारसंघात चंद्रशेखर घुले आणि त्यांच्या पत्नी राजश्री घुले यांचे अर्ज शिल्लक आहेत.
चंद्रशेखर घुले यांची उमेदवारी कायम ठेवून राजश्री घुले यांचा अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. कोपरगावमध्ये बिपीन कोल्हे आणि त्यांचे चिरंजीव आमदार विवेक कोल्हे यांचे अर्ज आहेत. त्यापैकी बिपीन कोल्हे यांचा अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता असून आमदार विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. आमदार कोल्हे हे जिल्हा बँकेचे माजी संचालक आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण 369 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये विविध कारणांमुळे काही अर्ज अवैध ठरले, तर काही अर्ज हरकतींमुळे बाद झाले. तसेच काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते. त्यामुळे आता वैध उमेदवारांची संख्या 239 झाली आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, आमदार डॉ. किरण लहामटे व माजी आमदार राहुल जगताप यांच्यासह 14 उमेदवाराच्या अर्जावर घेण्यात आलेल्या हरकती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी फेटाळल्या आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया बुधवारी सुरू झाली असून 21 ऑक्टोबरपर्यंत ती सुरू राहणार आहे. या कालावधीत विविध मतदारसंघांत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून उमेदवारी माघारीसाठी पडद्यामागे मोठ्या प्रमाणावर हालचाली होण्याची चिन्हे आहेत.
कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार ?
सेवा सोसायटीच्या अकोले मतदारसंघात 11, जामखेड 3, कर्जत 10, कोपरगाव 2, नगर 3, नेवासा 1, पारनेर 4, पाथर्डी 3, राहाता 2, राहुरी 3, संगमनेर 1, शेवगाव 2, श्रीगोंदा 10 आणि श्रीरामपूर 4 उमेदवार आहेत. शेतीपूरक मतदारसंघात 28, बिगरशेती 37, महिला 44, अनुसूचित जाती-जमाती 12, इतर मागासवर्गीय (ओबीसी) 41 आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गात 18 उमेदवार रिंगणात आहेत.
घोगरे न्यायालयात जाणार
राहाता मतदारसंघात माजी खासदार सुजय विखे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेले एकनाथ चंद्रभान घोगरे यांनी त्यांच्या अर्जावरील हरकतीविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याची भूमिका घेतली आहे. विखे यांच्या विरोधात घोगरे यांनी दाखल केलेली हरकत फेटाळण्यात आली. तसेच घोगरे यांच्या अर्जावरील सूचकाने त्यांची सही नाकारल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आला. या दोन्ही निर्णयांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे घोगरे यांचे वकील सुरेश लगड यांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दिवसभर प्रतीक्षा करूनही निकालाच्या प्रती उपलब्ध करून दिल्या नसल्याचा आरोपही वकील लगड यांनी केला.




