अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी फोन डिप्लोमसीचा वापर करत राजकीय समीकरणे जुळविण्याच्या हालचाली सुरू केल्या. विळद घाट येथून त्यांनी जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या इच्छुक उमेदवारांसह जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत चर्चा केली. अनेक इच्छुकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना करत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न या चर्चेतून करण्यात आल्याचे समजते.
जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित नसून, जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीत अधिकाधिक जागा बिनविरोध करण्यासाठी किंवा उमेदवारांमध्ये समन्वय साधण्यासाठी राजकीय नेत्यांकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी थेट इच्छुक उमेदवार आणि विविध पक्षांच्या प्रमुखांशी संपर्क साधल्याने त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेसाठी अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणुकीत कोण माघार घेणार आणि कोण निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांशी चर्चा करून त्यांना माघार घेण्याची सूचना केल्याने या निवडणुकीत पडद्यामागील राजकीय हालचालींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
नेते आणि अधिकार्यांची विश्रामगृहावर धावपळ
सोमवारी दुपारी अचानक पालकमंत्री विखे पाटील हे नगरच्या शासकीय विश्रामगृहावर उपस्थित राहणार असल्याचा निरोप यंत्रणा आणि अधिकारी यांना मिळाला. यामुळे भाजपसह अन्य सर्वच राजकीय पक्षाचे प्रमुख यांनी नगरच्या शासकीय विश्रामगृहाकडे कूच केला. यावेळी अधिकारी यांच्यासह राजकीय नेत्यांचा समावेश होता.




