अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र लाडक्या बहिण योजनेच्या अंमलबजावणीमुळे व सरकारचा आर्थिक डोलारा वाढल्यामुळे यंदा सरकारकडून शेतकर्यांना कर्जमाफी मिळू शकली नाही. मात्र, कर्जमाफीच्या आशेवर असणार्या शेतकर्यांनी घेतलेल्या कर्जाचा भरणा न केल्याने राज्यात अग्रेसर असणार्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मार्चअखेर अवघी 40 टक्के वसुली झालेली आहे. कमी झालेल्या वसूलीचा जिल्हा बँकेच्या अर्थकारणावर परिणाम होणार असून यामुळे शेतकर्यांनी थकीत कर्जाची वसूली भरण्याची मागणी बँकेच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्यावतीने शेतकर्यांना मागील आर्थिक वर्षात दिलेल्या विविध कर्जापोटी 5 हजार 300 कोटीचे कर्ज वसुलीस पात्र होते.
यापैकी अवघे 2 हजार 70 कोटींचे कर्ज वसूल झालेल्या असून 2 हजार 200 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या वतीने देण्यात आली. बँकेची झालेली वसुली अवघी 40 टक्के असल्याने त्याचा पुढील कर्ज वाटपावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. दरम्यान राज्यातील महायुती सरकारकडून कर्जमाफी मिळेल या आशेवर शेतकरी होते. यामुळे त्यांनी मार्चअखेर थकीत कर्जाची रकमा भरल्या नाहीत. अन्य बँकांचे आर्थिक वर्ष 31 मार्च असले तरी जिल्हा बँकेचे दरवर्षी 30 जूनला नवे-जुने करण्यात येते. दरम्यान, मार्चअखेर बँकेची 40 टक्के वसुली असली तरी ती 30 जूनअखेर वाढणार नसल्याचा अंदाज असून यामुळे यंदा जिल्हा बँकेची 50 टक्क्यांपेक्षा जास्त कर्ज वसुली रखडण्याची शक्यता आहे.
82 सहकारी संस्थांची शंभर टक्के वसुली
जिल्हा बँके अंतर्गत येणार्या गाव पातळीवरील सहकारी संस्थांपैकी अवघ्या 82 संस्थांची मार्च अखेर 100 टक्के वसुली झाली असल्याचे जिल्हा बँकेचे वतीने सांगण्यात आले.
थकीत भरा अन् व्याजात सवलत मिळवा
शेतकर्यांनी मागील वर्षी घेतलेले कर्ज वेळेत भरल्यास बँकेच्या वतीने संबंधित शेतकर्यांना सरकारच्या शून्य टक्के व्याजदर योजनेचा फायदा देता येणार आहे. यासाठी शेतकर्यांनी घेतलेल्या विविध कर्जाची वेळेत परतफेड करावी, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आली आहे.