अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत नेवासा तालुक्यात पुन्हा एकदा गडाख परिवाराचा सहकारातील दबदबा अधोरेखित झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी, सोमवार (दि. 5) नेवासा तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे या मतदारसंघातून गडाख यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे. दरम्यान, गडाख यांच्या पाठोपाठ घुले परिवार यांची बिनविरोधच्या दिशेन वाटचाल आहे.
नेवासा तालुक्यात सुमारे 130 सेवा सोसायट्या मतदार असलेल्या या मतदारसंघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये सोसायटी मतदारसंघासाठी इच्छुकांची मोठी गर्दी असताना नेवाशात मात्र गडाख यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने सहकार क्षेत्रात त्याची विशेष चर्चा सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यापासून शंकरराव गडाख यांच्यापर्यंत गडाख परिवाराने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. यापूर्वी जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही गडाख यांनी सांभाळली आहे. 2007 मध्ये त्यांच्या कार्यकाळात महिला बचत गटांना चार टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला गेला होता. त्यामुळे गडाख यांची सहकारातील राजकीय व संघटनात्मक ताकद या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसून आली आहे.
व्याही-व्याहीनबाईही बिनविरोधच्या वाटेवर
गडाख यांचे व्याही आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले तसेच त्यांच्या पत्नी राजश्रीताई घुले यांचीही जिल्हा बँकेच्या संचालकपदाकडे वाटचाल सुरू आहे. शेवगाव सोसायटी मतदारसंघातून घुले दाम्पत्याच्या उमेदवारीचे चित्र महत्त्वाचे ठरणार आहे.दहा वर्षांच्या संचालकपदाच्या नियमाचा अडसर आल्यास चंद्रशेखर घुले यांच्या ऐवजी पत्नी राजश्रीताई घुले यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गडाख-घुले परिवाराचा जिल्हा बँकेतील प्रवेश कायम राहणार का, याकडेही लक्ष लागले आहे.
अकोले, श्रीगोंदा, कर्जतमध्ये सर्वाधिक इच्छुक
सोसायटी मतदारसंघात सर्वाधिक चुरस अकोले, श्रीगोंदा आणि कर्जत येथे दिसत आहे. अकोलेमध्ये तब्बल 19, श्रीगोंद्यात 16, तर कर्जत मतदारसंघात एका जागेसाठी 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
नगरमध्ये कर्डिले यांच्या विरोधात हराळ, शेळके
नगर तालुका सोसायटी मतदारसंघात आमदार अक्षय कर्डिले यांच्या विरोधात त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक बाळासाहेब हराळ आणि प्रताप शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हराळ यांना सभापती राम शिंदे, तर शेळके यांना खासदार नीलेश लंके यांची साथ असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत या दोन्ही उमेदवारांचे अर्ज कायम राहतात की राजकीय ङ्गगणितफ बदलते, याकडे लक्ष लागले आहे.
पारनेरमध्ये खासदारांविरोधात आमदार
पारनेर तालुका सोसायटी मतदारसंघात खासदार नीलेश लंके यांच्या विरोधात आमदार काशिनाथ दाते यांच्यासह संचालक गितांजली शेळके आणि राहुल शिंदे यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील हा मतदारसंघ सर्वाधिक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.
राजळेंना ढाकणेंचे आव्हान
पाथर्डी तालुका सोसायटी मतदारसंघात आमदार मोनिका राजळे यांच्यासमोर ऋषिकेश ढाकणे यांनी आव्हान उभे केले आहे. याशिवाय कडूचंद्र शेटे यांनीही अर्ज दाखल केला आहे. राहुरीमध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह हर्ष तनपुरे आणि सत्यजित कदम यांनी अर्ज दाखल केल्याने येथेही चुरस निर्माण झाली आहे.
बिगरशेती मतदारसंघात तब्बल 54 अर्ज
बिगरशेती मतदारसंघात सर्वाधिक 54 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सचिन जगताप, प्रतापसिंह पाचपुते, शिक्षक नेते रावसाहेब रोहकले, प्रतिभा पाचपुते यांच्यासह 54 इच्छुकांचा समावेश आहे. त्यामुळे या मतदारसंघातील माघारीकडे सर्वांचे विशेष लक्ष राहणार आहे.
विखेंच्या मार्गात एकनाथ घोगरे
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील प्रमुख दावेदार मानले जाणारे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात एकनाथ चंद्रभान घोगरे यांनी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय भास्कर खर्डे यांचाही अर्ज असल्याने विखे गटाला आता या मतदारसंघात राजकीय ‘फिल्डिंग’ लावावी लागणार आहे.
श्रीरामपुरात ससाणे गटाची कसोटी
श्रीरामपूर सोसायटी मतदारसंघात करण ससाणे यांचा प्रमुख अर्ज मानला जात असून त्यांच्या विरोधात सोन्याबापू शिंदे, रणजित बनकर आणि सोपानराव राऊत यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे श्रीरामपूरमध्येही माघारीच्या टप्प्यात कोणते राजकीय गणित जुळते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
आजोबा आणि नातवाची उमेदवारी
ओबीसी मतदारसंघातून श्रीरामपूर तालुक्यातून ज्येष्ठनेते तथा बँकेचे माजी संचालक भानुदारस मुरकुटे यांच्यासह त्यांचा नातू निरज मुरकुटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे. या ठिकाणी कोणाचा अर्ज राहणार आणि कोण माघार घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.
देशमुख यांच्यासमोर गायकवाड
संगमनेरमध्ये एकाच उमेदवाराचा अर्ज असून बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजितसिंह देशमुख यांच्या विरोधात चित्रा गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे. गायकवाड यांनी माघार घेतल्यास देशमुख यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा होणार आहे.
आ. काळेंसह 36 अर्ज
शेतीपूरक व शेतीमाल प्रक्रिया मतदारसंघात आमदार आशुतोष काळे यांच्यासह राजेंद्र नागवडे, वैभव पिचड, हर्षदा काकडे यांच्यासह एकूण 36 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातही माघारीसाठी मोठी राजकीय रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.




