अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतिहासात विखे पाटील परिवाराला तिसर्यांदा चेअरमनपदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, त्यांच्यानंतरमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आता माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या रूपाने या परिवाराने बँकेच्या नेतृत्वाची धुरा सांभाळला मिळणार आहे. दुसरीकडे, उपाध्यक्षपदी संगमनेर तालुक्यातील रणजितसिंह देशमुख यांची निवड झाल्याने देशमुख आडनावाच्या व्यक्तींना या पदावर मिळालेली ही तिसरी संधी ठरली आहे.
जिल्हा बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदाच्या निवडी गुरुवारी पार पडल्या. यामध्ये चेअरमनपदी डॉ. सुजय विखे पाटील, तर व्हाईस चेअरमनपदी रणजितसिंह देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे, दोघांनाही पहिल्यांदाच संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळत असताना थेट बँकेच्या सर्वोच्च पदांची जबाबदारी मिळाली आहे. जिल्हा बँकेच्या इतिहासात 1969-70 मध्ये पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची चेअरमनपदी निवड झाली होती. त्यावेळी दिवंगत नेते भाऊसाहेब थोरात यांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर काही वर्षापूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चेअरमनपदाची जबाबदारी सांभाळली. आता डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडीमुळे विखे परिवाराची जिल्हा बँकेवरील नेतृत्वाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे.
उपाध्यक्षपदाच्या इतिहासातही देशमुख घराण्याचे योगदान राहिले आहे. नेवासा तालुक्यातील भाऊसाहेब देशमुख, कर्जत तालुक्यातील राशीन येथील के. रा. ऊर्फ बापूसाहेब देशमुख आणि आता संगमनेर तालुक्यातील रणजितसिंह देशमुख यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. रणजितसिंह देशमुख हे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे जावई आहेत.
वैद्यकीय शिक्षण घेतलेले तिसरे संचालक
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या व्यक्तींनाही यापूर्वी प्रतिनिधित्व मिळाले आहे. माजी आमदार डॉ. व्ही. एस. निसळ आणि नगर जिल्ह्यातील पहिले एम.डी. असलेले डॉ. श्रीराम रानडे यांच्यानंतर आता न्यूरोसर्जन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या रूपाने वैद्यकीय क्षेत्रातील तिसर्या व्यक्तीला संचालकपदाची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, डॉ. विखे पाटील यांची थेट चेअरमनपदी निवड झाल्याने हा योग अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.
पहिल्याच संचालकपदावर थेट पदाधिकारी
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात पहिल्यांदाच प्रवेश करताच डॉ. सुजय विखे पाटील आणि रणजितसिंह देशमुख यांना अनुक्रमे चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची जबाबदारी मिळाली आहे. दुसरीकडे, मागील संचालक मंडळातील माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार आशुतोष काळे, आमदार मोनिकाताई राजळे, गणपतराव सांगळे आणि अनुराधाताई नागवडे यांना पुन्हा एकदा संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे नव्या संचालक मंडळात अनुभवी आणि नव्या चेहर्यांचा संगम पाहायला मिळत आहे.




