Thursday, October 22, 2026
HomeनगरAhilyanagar : विखे, थोरात, गडाख आणि घुलेंची बंद दाराआड चर्चा

Ahilyanagar : विखे, थोरात, गडाख आणि घुलेंची बंद दाराआड चर्चा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. यात मंगळवारी सकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि बँकेचे माजी चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील यांची माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नगरमधील निवासस्थानी बुधवारी (दि. 21) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

- Advertisement -

बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या अंतिम प्रयत्नांचा भाग म्हणून बुधवारी सकाळी माजी मंत्री गडाख यांच्या यशवंत कॉलनीतील निवासस्थानी बैठक झाली. सुरूवातीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि बँकेचे माजी चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील हे गडाख यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास पालकमंत्री विखे पाटील यांचा ताफा तेथे पोहोचला. पुढील काही वेळात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही बैठकीला हजेरी लावली.

या बैठकीबाबत गोपनीयता पाळण्यात आली होती. बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. सुमारे अर्धा तास चाललेल्या बैठकीनंतर सर्वप्रथम पालकमंत्री विखे पाटील बाहेर आले. यावेळी त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. मात्र, यापुढे अधिक भाष्य करणे त्यांनी टाळले. त्यानंतर ते नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

सर्व जागांवर बिनविरोध होणे कठीण – डॉ. विखे
काही वेळाने माजी खासदार डॉ. विखे पाटील बैठकीतून बाहेर आले. त्यांनीही बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. मात्र, सर्वच जागा बिनविरोध होतील, असे नाही, असे स्पष्ट करत त्यांनी निवडणुकीचे संकेत दिले. ज्या जागांवर एकमत होऊ शकते, त्या जागा बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी समजावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. विखे पाटील यांच्या या प्रतिक्रियेतून जिल्हा बँकेच्या सर्व जागांवर बिनविरोध निवड होणे कठीण असल्याचे संकेत मिळाले. निवडणूक पूर्णपणे बिनविरोध करण्याऐवजी काही जागांवर उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता त्यांच्या वक्तव्यातून व्यक्त झाली होती.

मोठ्या संख्येने उमेदवार असल्याने अडचण – थोरात
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. मात्र, दोनशेपेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झालेले असल्याने एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज मागे घेणे सोपे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या प्रतिक्रियेतूनही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होण्याबाबत साशंकता व्यक्त झाली होती.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 12 जागांसाठी उमेदवार जिल्हा बँकेच्या आखाड्यात; कोण कोण झाले...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत बुधवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूूक बिनविरोधचा फुसका बार फुसका ठरला....