अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
यंदाच्या विधानसभा निवडणूक लढवणारे आणि मतदार यादीत नावे असणार्या 118 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. या उमेदवारांना एकूण वैध मतांच्या 16.33 मते मिळालेली नाहीत. डिपॉझीट जप्त होणार्यामध्ये बहुतांशी उमेदवार हे अपक्ष आहेत. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 नुसार, संसदीय किंवा विधानसभा निवडणूक लढविणार्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठरावीक रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. वेगवेगळ्या निवडणुकीसाठी वेगवेगळी रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. संसदीय निवडणूक लढविण्यासाठी 25 हजार रुपये आणि विधानसभा निवडणुकीसाठी 10 हजार रुपये, अशी रक्कम निर्धारित करण्यात आली आहे.
ही रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा केली जाते आणि या रकमेला निवडणुकीतील सुरक्षा ठेवही म्हणतात. निवडणूक लढविण्यासाठी केवळ गंभीर असलेल्या उमेदवारांनीच नामांकन दाखल केल्याची खात्री करण्यासाठी अनामत रक्कम भरणे अनिवार्य आहे. उमेदवारीचा अर्ज दाखल करतानाच ही रक्कम भरावी लागते. देशात मुक्त आणि निष्पक्ष संसदीय आणि विधानसभा निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक प्रकारची पावले उचलली जातात. सुरक्षा रक्कम जमा करणे हादेखील त्याचाच एक भाग आहे. उमेदवाराला मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या 1/6 म्हणजेच 16.33 टक्के मते किंवा त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास, त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीसाठी असणारी 151 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यातील काही मतदारसंघातील उमेदवारींनी मतदानापूर्वी दुसर्या उमेदवाराला पाठींबा देत माघार घेतली. तर उर्वरित अपक्ष अथवा लहानपक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यातील 118 जणांचे डिपॉझिट झाले आहेत.
असे आहे डिपॉझिट जप्त झालेले
नगर 12, पारनेर 10, श्रीगोंदा, राहुरी आणि पाथर्डी प्रत्येकी 11, नेवासा 9, श्रीरामपूर 12, कर्जत-जामखेड 9, राहाता 6, कोपरगाव आणि संगमनेर प्रत्येकी 10 आणि अकोले 7 अशा 118 उमेदवारांचा यात समावेश आहे.