अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात जिल्ह्यांत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकर्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार आणखी सहाशे अठठेचाळीस कोटी पंधरा लक्ष एकेचाळीस हजार रूपये इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात आली आहे. त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील 22 हजार 434 नुकसानग्रस्त शेतकर्यांना 33 कोटी 19 लाखांचा निधी मिळणार आहे. हा निधी सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकर्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे ऐन दिवाळीत पूरग्रस्त शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
डीबीटी पोर्टलव्दारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरीत करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतीपिकांच्या नुकसानीकरिता वितरीत करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तांवातर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात 23 हजार991 हेक्टरवर नुकसान झाले होते. या सर्वांना आता ही मदत मिळणार आहे.




