Wednesday, December 4, 2024
Homeनगरजिल्ह्यातील 2 हजार 625 जणांची घरबसल्या मतदान करण्यास पसंती

जिल्ह्यातील 2 हजार 625 जणांची घरबसल्या मतदान करण्यास पसंती

वृध्द, दिव्यांग व्यक्तींसाठी सुविधा || आजपासून राबवली जाणार प्रक्रिया

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

वृध्द, दिव्यांग व्यक्तींनी केलेल्या मागणीनुसार त्यांच्या घरी जाऊन, घरबसल्या मतदान पध्दत अहमदनगर शहर मतदार संघात आज, शनिवार व उद्या, रविवारी अशी दोन दिवस राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील इतर मतदारसंघांत मात्र ही प्रक्रिया दि. 14, 15 व 16 नोव्हेंबर अशी तीन दिवस राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील 2 हजार 625 जणांनी घरबसल्या मतदान करण्यास पसंती दिली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने 85 वर्षाहून अधिक तसेच दिव्यांग व्यक्तींना घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र त्यासाठी संबंधित मतदाराने तशी लेखी पूर्वइच्छा व्यक्त करायला हवी. जिल्ह्यात 80 ते 90 वयाचे 92 हजार 671, 90 ते 100 वयोगटातील 19 हजार 772 तर 110 पर्यंत वय असलेले 1 हजार 663, तसेच 110 वयाचे 1 तर 120 वयापर्यंतचे 1 वृध्द व्यक्ती आहेत. त्यांच्यासह दिव्यांगांना ही सुविधा देण्यात आली आहे. यातील जिल्ह्यातील 2 हजार 625 जणांनी घरबसल्या मतदान करण्यास पसंती दिली आहे.

यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने 137 पथके तयार केली आहेत. या पथकामध्ये 2 मतदान अधिकारी, एक सूक्ष्म निरीक्षक, पोलीस, व्हिडिओग्राफर, मदतनीस यांचा समावेश आहे. ही पथके कोणत्या मार्गाने मतदारांच्या घरी जाणार यासाठी 195 मार्गिका ठरवून देण्यात आल्या आहेत. या मार्गिकेवरून मतपत्रिका घेऊन धावणार्‍या वाहनांना ‘जीपीएस’ प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यामुळे मार्गिका सोडून जाणार्‍या वाहनांना प्रतिबंध बसणार आहे. उमेदवार व त्याच्या प्रतिनिधीला मतदानावेळी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी पथक कोणत्या वेळेला मतदाराच्या घरी पोहोचेल, याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आगाऊ कळवण्यात आले आहे.

त्यावेळी पथक मतदाराच्या घरी मतदान कक्ष निर्माण करून मतदान करून घेईल. यासाठी मतपत्रिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रिया झाल्यानंतर त्याच दिवशी सर्व मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकारी ‘स्ट्रॉग रूम’ मध्ये जमा करणार आहेत. अहमदनगर शहर मतदारसंघात ही प्रक्रिया आज व उद्या राबवली जाणार आहे. नगर शहरात असे 143 मतदार असून त्यामध्ये 131 ज्येष्ठ नागरिक तर 12 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या