Friday, November 22, 2024
Homeनगरसिव्हिलचा कर्मचारी तोफखाना पोलिसांच्या जाळ्यात; काय आहे प्रकरण ?

सिव्हिलचा कर्मचारी तोफखाना पोलिसांच्या जाळ्यात; काय आहे प्रकरण ?

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचार्‍याला तोफखाना पोलिसांनी काल, सायंकाळी ताब्यात घेत अटक केली. योगेश बबन बनकर (रा. भिंगार) असे अटक केलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. जिल्हा रुग्णालयातील अज्ञात कर्मचार्‍यांना हाताशी धरून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता, रुग्णालयात नोंद न करता ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरली. त्याव्दारे कर्णबधीर असल्याचे बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या चौकशीतून समोर आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी तालुक्यातील सागर भानुदास केकान, प्रसाद संजय बडे, सुदर्शन शंकर बडे, गणेश रघुनाथ पाखरे यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील अज्ञात कर्मचार्‍यांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केलेल्या पडताळणीमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र दिलेल्या दिवशी रजिस्टरला कोणतीही नोंद नसल्याचे व वैद्यकीय तपासणी अहवाल, कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे समोर आले. पोर्टलवर मात्र, चौघांच्याही दिव्यांग प्रमाणपत्रांची नोंद आढळली. त्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील करत आहेत. पोलिसांनी तपासादरम्यान दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी काम करणार्‍या जिल्हा रुग्णालयातील संबंधित कर्मचार्‍यांचे जबाब नोंदविले आहेत. जे चार दिव्यांग प्रमाणपत्र बनावट आढळून आले आहेत. ते पोलिसांनी पंचासमक्ष जिल्हा रुग्णालयातून जप्त केले आहेत. तसेच पोलिसांनी जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाला पत्र पाठवून दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्याची प्रक्रिया कशी आहे, हे प्रमाणपत्र कोणाला दिले जाते, त्यासाठी संबंधितांची तपासणी करण्याचे अधिकार कोणाला आहेत. पोर्टल सुरू झाले तेव्हापासून आतापर्यंत किती जणांना दिव्यांग प्रमाणपत्र वितरित केले त्याची यादी मागितली आहे.

दरम्यान, दिव्यांग प्रमाणपत्र काढून देण्यात जिल्हा रुग्णालयातील काही अधिकारी व कर्मचारी सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीकोनातून पोलिसांनी तपास केला असता काही नावे निष्पन्न करण्यात आली. त्यातील योगेश बनकर या कर्मचार्‍याचे नाव समोर आले आहे. तो पसार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो काल, मंगळवारी भिंगारच्या सदर बाजारात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला तेथून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेमुळे जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पाटील, अंमलदार सुनील शिरसाठ, दत्तात्रय जपे, अहमद इनामदार, सुमित गवळी, भानुदास खेडकर, सतीश त्रिभुवन आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

या गुन्ह्यात चार जणांसह त्यांना प्रमाणपत्र काढण्यासाठी मदत करणार्‍या जिल्हा रूग्णालयातील संशयितांचा आरोपीमध्ये समावेश आहे. ते सर्वजण गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झाले आहेत. त्यातील योगेश बनकर पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलीस त्याच्याकडे चौकशी करत आहेत. यानंतर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र कसे काढले जात होते याची माहिती समोर येणार आहे. रुग्णालयातील आणखी किती अधिकारी, कर्मचारी यात सहभागी आहेत हे देखील समोर येणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या