Monday, June 15, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्हा रूग्णालयातील एमएलसी रेकॉर्डची चोरी

Ahilyanagar : जिल्हा रूग्णालयातील एमएलसी रेकॉर्डची चोरी

2021-22 मधील 24 गठ्ठे गायब || पोलिसांकडून तपास सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

येथील जिल्हा शासकीय रूग्णालयातील ‘एमएलसी’ विभागाच्या रेकॉर्ड रूममध्ये अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे ग्रील काढून प्रवेश करत महत्त्वाचे जुने रेकॉर्ड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे रूग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. याबाबत जिल्हा रूग्णालयातील कनिष्ठ लिपीक कैलास काशिनाथ शिंदे (वय 45, रा. कल्याण रस्ता) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी (9 जून) सायंकाळी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिंदे हे एमएलसी विभागात कार्यरत असून एमएलसी रेकॉर्डची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

- Advertisement -

फिर्यादीनुसार, जिल्हा रूग्णालय परिसरातील व्हिडिओ कॉन्फरन्स रूम व सिटी स्कॅन विभागाजवळील रेकॉर्ड रूममध्ये मागील 15 वर्षांतील एमएलसी व पोलीस प्रकरणांशी संबंधित कागदपत्रे जतन करून ठेवण्यात आली आहेत. 5 जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास शिंदे यांनी रेकॉर्ड रूम तपासून दरवाजाला कुलूप लावले होते. मात्र, 9 जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास जुने रेकॉर्ड पाहण्यासाठी ते रूममध्ये गेले असता कुलूप उघडूनही दरवाजा उघडत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरवाजाला आतून कडी लावलेली असल्याचा संशय आल्याने त्यांनी रूमच्या मागील बाजूस जाऊन पाहणी केली. त्यावेळी खिडकी उघडी असून तिचे लोखंडी ग्रील काढून टाकण्यात आल्याचे आढळले. यानंतर शिंदे यांनी उघड्या खिडकीतून रूममध्ये प्रवेश केला असता काही रेकॉर्ड जमिनीवर विखुरलेले दिसले.

अधिक तपासणी केल्यानंतर सन 2021 ते 2022 या कालावधीतील एमएलसी ओपीडी एक्स-रे विभागाशी संबंधित जुने रेकॉर्ड बांधून ठेवलेले तब्बल 24 गठ्ठे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी रेकॉर्डसह खिडकीचे लोखंडी ग्रीलही चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळी तोफखाना पोलिसांनी भेट दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे जिल्हा शासकीय रूग्णालयातील संवेदनशील रेकॉर्डच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून चोरी गेलेल्या कागदपत्रांमध्ये वैद्यकीय व पोलीस तपासाशी संबंधित महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

SLA vs INDA : भारत-श्रीलंका सामना टाय; सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचा रोमहर्षक...

0
दिल्ली । Delhi श्रीलंका, भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान सुरू असलेल्या चालू त्रिकोणीय मालिकेत आज क्रिकेटचा खरा थरार पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या...