अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्याच्या राजकारणात शनिवारी भूकंप झाला. यात अनेक मतदारसंघांत धक्कादायक आणि आश्चर्यकारक निकाल लागले आहेत. यामुळे जिल्ह्यातील विधानसभेच्या 12 जागांमध्ये महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणार्या काँग्रेस आणि शरद पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळाली असून जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक चार, अजितदादांच्या राष्ट्रवादीला चार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक प्रबळ समजल्या जाणार्या राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा नगर जिल्ह्यात दारूण पराभव झाला असून याचा जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे.
यंदा आयुष्यातील नववी निवडणूक लढवणारे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमध्ये पराभवाचा धक्का बसला. मूळचे भाजपचे पण शिंदेसेनेकडून निवडणूक लढवत असलेले अमोल खताळ यांनी याठिकाणी बाजी मारली. कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आशुतोष काळे सर्वाधिक 1 लाख 23 हजार मतांनी विजयी झाले आहेत. शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील आठव्यांदा, राहुरीतून शिवाजी कर्डिले यांना पाच वर्षाच्या खंडानंतर, श्रीगाेंंद्यातून विक्रम पाचपुते, शेवगाव- पाथर्डीतून मोनिका राजळे तसेच कर्जत-जामखेडमधून रोहित पवार यांना पुन्हा आमदार होण्याची संधी मिळाली आहे.
यासह नगरमध्ये संग्राम जगताप, कोपरगावमध्ये काळे, पारनेरमध्ये काशिनाथ दाते आणि अकोल्यात डॉ. किरण लहामटे यांच्यासह संगमनेरमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे उमेदवार अमोल खताळ आणि नेवाशात विठ्ठलराव लंघे विजयी झालेले आहेत. जिल्ह्यात महाविकास आघाडीतील काँग्रेसला श्रीरामपूरमध्ये हेमंत ओगले यांच्या रुपाने एकमात्र जागा मिळालेली आहे.
नेवाशात माजी मंत्री शंकरराव गडाख़ यांचा पराभव झाला. भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष असलेले व शिंदेसेनेच्या तिकीटावर उभे राहिलेले लंघे यांनी येथे विजय मिळवला. तर पाथर्डीत मोनिका राजळे यांनी विजयाची हॅट्ट्रीक साधली. त्या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरलेले चंद्रशेखर घुले पाटील यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत गडाख आणि घुले व्याही-व्याही होते. निवडणुकीत दोनही व्याह्यांचा पराभव झाला.
तर राहुरीतील आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यासह नगरमधील त्यांचे जावई संग्राम जगताप असे सासरे आणि जावई यांचा विजय झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात पाच नवीन चेहर्यांना संधी मिळाली आहे. यात लंघे, खताळ, ओगले, पाचपुते आणि दाते यांचा समावेश आहे. तर निवडणुकीत असणार्या 9 महिला उमेदवारांपैकी एकट्या मोनिकाताई राजळे यांना विजय मिळवता आला आहे. मोनिका राजळे व संग्राम जगताप यांनी सलग तीन निवडणुकांतून विजय मिळवत हॅटट्रीक साधली आहे व या दोघांच्याही मंत्रीपदाची आशा जिल्हावासियांना आहे.
मिनीमंत्रालयातून थेट मंत्रालयात
जिल्हा परिषदेच्या वर्तुळात काम करणार्या सदस्य, पदाधिकारी यापैकी अनेकांना आमदार होण्याची संधी यापूर्वी मिळालेली आहे. यात अनेक बड्या नेत्यांचा समावेश असून अलीकडच्या 10 ते 15 वर्षात जिल्हा परिषदेत काम करणारे सदस्य वैभव पिचड, राहुल जगताप, मोनिक राजळे, डॉ. किरण लहामटे यांना आमदार होण्याचा मान मिळला होता. यंदा पुन्हा राजळे तिसर्यांदा तर लहामटे दुसर्यांदा आमदार झालेल्या असून नव्याने लंघे आणि दाते यांच्या रुपाने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आमदार होण्याची संधी मिळालेली आहे.
विखे पाटील यांचा करिष्मा
जिल्ह्याच्या राजकारणात विखे पाटील यांचा नाद करायचा नाही, असे जुन्या काळातपासून म्हटले जात होते. लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला. मात्र, या पराभवाला कारणीभूत असणार्या सर्वांना विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवला आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह खा. नीलेश लंके यांचाही समावेश आहे. विखे यांनी एकाच वेळी संगमनेर, शिर्डी, नेवासा, राहुरी, पारनेरमधील निवडणुकीची खिंड लढवत विरोधकांना पराभवाची धूळ चारली आहे. हे करत असताना आपले कार्यकर्ते असणारे खताळ यांना संगमनेरमध्ये, महायुतीचे दाते यांना पारनेरमध्ये, सहकारी असणारे कर्डिले यांना राहुरीत, नेवाशात लंघे यांना विजयी करण्यात विखे पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे.
पूर्वीचे आणि आताचे बलाबल
2019 च्या निवडणुकीत एकत्र असणारे राष्ट्रवादीचे 6, भाजपचे 6, काँग्रेसचे 2 आणि 1 अपक्ष असे बलाबल होते. यंदा भाजप 4, अजित पवार राष्ट्रवादी 4 आणि शिंदे सेना 2 असे निवडून आलेले असून काँग्रेस आणि शरद पवार गटाला प्रत्येकी 1 जागा मिळालेली आहे. उध्दव ठाकरे सेनेचा सुफडसाफ झाला आहे.
हे आहेत नवीन चेहरे
जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अमोल खताळ, हेमंत ओगले, काशिनाथ दाते, विक्रम पाचपुते आणि विठ्ठलराव लंघे हे नवीन चेहरे आमदार म्हणून निवडून आले आहेत.
महाविकास आघाडीला दक्षिणेत दणका
दक्षिणेतील श्रीगोंदा आणि नगर शहरातील जागांची अदलाबदली महाविकास आघाडीचा चांगलीच भोवली आहे. नगर शहरातील जागेसाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही होता. मात्र, ऐनवेळी ही जागा राष्ट्रवादीला देण्यात आली. तर श्रीगाेंंद्यातील जागा राष्ट्रवादी मागत असताना त्याठिकाणी ही जागा शिवेसेना ठाकरे गटाला देण्यात आली. यामुळे श्रीगोंद्यात राष्ट्रवादी, तर नगरमध्ये शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते,नेते नाराज झाले होते. तर पारनेर तालुक्यातील मूळ शिवसैनिक आणि नगर तालुक्यातील शिवसैनिकांची मागणी असतानाही त्याठिकाणी राणीताई लंके यांना दिलेल्या उमेदवारीचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे.
पाचपुतेंसह मूळ श्रीगोंद्याचे चार आमदार
श्रीगोंदा येथून राजकीय सुरुवात करणारे हेमंत ओगले हे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात विजयी झाले. यामुळे ते मूळचे श्रीगोंदा येथील आमदार झाले श्रीगोंदा मधील बनपिंप्रीचे मूळचे असलेले संग्राम जगताप हे नगर शहरात पुन्हा आमदार झाले. तसेच विक्रम पाचपुते हे देखील आमदार झाले.तर विधानपरिषदेत मूळचे लोणी व्यंकनाथ मधील अमित गोरखे सध्या पिंपरी चिंचवडमध्ये असतात ते आमदार आहेत.