Monday, October 5, 2026
HomeनगरRahata : अहिल्यानगर जिल्ह्यातून मान्सुनची वेळेआधीच माघार

Rahata : अहिल्यानगर जिल्ह्यातून मान्सुनची वेळेआधीच माघार

दुष्काळाची तीव्रता आणखी वाढणार

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

अहिल्यानगर आणि मध्य महाराष्ट्रातून साधारणपणे 8 ते 10 ऑक्टोबरला मान्सून माघारी जातो. परंतु यावेळी तो 3 ते 4 ऑक्टोबरलाच माघारी गेल्याने रब्बी हंगामावरही प्रतिकूल परिणाम होणार आहे. जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जवळपास 50 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. पाऊस कमी झाल्यामुळे आणि मान्सून वेळेआधीच माघारी गेल्यामुळे जिल्ह्यात सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीट सुरु झाली. खंडीत आणि अपुरा पाऊस पडल्याने जमिनीतील ओलावा संपला आहे. मान्सून वेळेआधीच माघारी गेल्यामुळे अचानक कडक ऊन पडायला सुरुवात झाली आहे. कमाल तापमान थेट 32 ते 35 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. हवेतील दमटपणा कमी झाल्याने कोरडा उकाडा तीव्रतेने जाणवत आहे. यावर्षी अपुर्‍या पावसामुळे भुजलपातळी न वाढल्याने विहीरींनी ऑक्टोबरमध्येच तळ गाठला आहे.

- Advertisement -

खरीप हंगाम हातातुन गेला आहेच परंतु रब्बी हंगामाची शक्यताही धुसर झाली आहे. महाराष्ट्रातील 358 तालुक्यापैकी आजपर्यंत 284 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. महाराष्ट्राच्या एकुण क्षेत्रापैकी जवळपास 80 टक्के क्षेत्र सध्या दुष्काळाच्या वणव्यात होरपळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासमोर येत्या काळात गंभीर जलसंकट आणि शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मूग, उडीद, सोयाबीन, मका, बाजरी यासारखी खरीप पिके पाण्याअभावी वाळून गेली आहेत. काही भागात विजेअभावी पाणी असुनही पिकांना वेळेत पाणी न मिळाल्याने ती पिके कडक उन्हामुळे करपली आहेत. उष्णतेमुळे पिकांची वाढ खुंटल्याने खरीप पिकांच्या सरासरी उत्पादनात 70 ते 80 टक्के इतकी प्रचंड घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ज्वारी, हरभरा, करडई यासारख्या रब्बी पिकांची पेरणी सुरू होते. मात्र जमिनीतील ओलावा पूर्णपणे संपल्यामुळे आणि विहिरींना पाणी नसल्यामुळे रब्बीच्या पेरण्या 70 ते 75 टक्क्यांनी घटण्याची भीती आहे.

पाऊस न पडल्यामुळे जनावरांच्या चार्‍याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुधनाचे बाजारभाव कमालीचे घसरले आहेत. आगामी काळात पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्याशिवाय पर्याय नाही. पाणीटंचाईने आजच गंभीर स्वरूप धारण केले असुन भविष्यात महाराष्ट्राच्या बहुतांश भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती येऊ शकते. घाटमाथ्यावरील धरणात यावर्षी समाधानकारक पाणीसाठे निर्माण झाले असले तरी अन्य भागात उद्भवलेली तिव्र पाणीटंचाई तसेच विक्रमी उष्णतेमुळे वेगाने होणारे बाष्पीभवन या पार्श्वभूमीवर पाणी नियोजन होणे आवश्यक आहे. जुलै 2027 पर्यंत म्हणजे जवळपास 9/10 महिने पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे काही धरणातील पाणीसाठे केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवणे भाग पडतील तर काही ठिकाणी शेतीसाठी संरक्षणात्मक दोन वा तीन आवर्तनाचे नियोजन होऊ शकते.

अर्थात विहीरींना पाणी नसल्याने केवळ कालव्याच्या मर्यादित पाण्यावर हंगाम यशस्वी होईल किंवा नाही याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना रब्बी हंगामात कोणती पिके घ्यायची आणि किती क्षेत्रावर घ्यायची याबाबत अत्यंत सावधगिरीची भुमिका घ्यावी लागेल. कारण येत्या काळात पाणीटंचाईची तिव्रता वाढली तर बिगर सिंचनासाठी पाण्याच्या आरक्षणात आणखी वाढ होऊ शकते. अहिल्यानगर जिल्हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असल्याने येथील दुष्काळ अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे. थंडीच्या दिवसात घट झाल्याने आणि हिवाळ्यातील वाढत्या तापमानामुळे गहु, हरभरा, ज्वारी यासारखी रब्बीची पिके वेळेआधीच परिपक्व होऊन त्यांचे सरासरी उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येणार असल्याची भिती कृषी विभागाने व्यक्त केली. हिवाळा उबदार असल्यामुळे आणि उन्हाळा लवकर सुरू होणार असल्याने पंखे, कुलर आणि एअर कंडिशनर्सचा वापर प्रचंड वाढुन विजेच्या भारनियमनात आणखी वाढ होईल. एकंदरीत यावर्षीचा दुष्काळ हा पाणीटंचाई, चाराटंचाई, रोजगार या आघाड्यांवर कमालीचा आव्हानात्मक असेल.

यंदाचा एल निनो अत्यंत तीव्र म्हणजे सुपर एल-निनो असून त्याचा प्रभाव मार्च 2027 पर्यंत कायम राहण्याची 100 टक्के शक्यता असल्याचे जागतिक हवामान संघटनेने घोषित केले आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा नेहमीसारखा कडक हिवाळा जाणवणार नाही. यावर्षी रात्रीचे आणि दिवसाचे किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. दरवर्षी साधारणपणे 40 ते 45 दिवस जाणवणारा कडक हिवाळा यावर्षी जेमतेम 15 ते 20 दिवस जाणवेल.
– उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता

ताज्या बातम्या

Ahilyanagar : विखे-शिंदे-थोरात एकत्र बसणार!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तर महाविकास आघाडीकडून माजीमंत्री बाळासाहेब थोरात...