अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
चार पालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्याने आता आठ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी 69 तर नगरसेवक पदांच्या 926 उमेदवार या आठ पालिकांच्या निवडणूक रिंगणात नशिब अजमावत आहेत. दरम्यान, सात पालिकांमधील 12 प्रभागाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी त्या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 4 पालिकांतील 12 सदस्यांची निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे स्थगिती मिळालेल्या ठिकाणी 20 डिसेंबरला मतदान तर 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. तर श्रीरामपूर, संगमनेर, जामखेड, राहाता, राहुरी, शिर्डी, शेवगाव व श्रीगोंदा या आठ नगरपालिकेसाठी आज मतदान होत आहे. यावेळी मतदारांना तीन मतदान करावे लागणार आहे. प्रभागातील दोन नगरसेवक व नगराध्यक्ष यांना मतदान करावे लागणार आहे. नगरपरिषद प्रभाग संख्या पुढीलप्रमाणे आहे.
श्रीरामपूर 17, संगमनेर 15, जामखेड 12, राहाता 10, शेवगाव 12, श्रीगोंदा 11, 10, शिर्डी 12. या निवडणुकीसाठी दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 6 उपविभागीय अधिकारी. 21 पोलीस निरीक्षक, 67 पोलीस उपनिरीक्षक, 1371 हेड कॉन्स्टेबल, 886 होमगार्ड, सीआरपीएफ, एसआरपी, क्युआरटी पथके असा पोलीस बंदोबस्त निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी राहणार आहे.
असे आहेत मतदार
शिर्डी 33 हजार 613, राहुरी 33 हजार 269, राहाता 19 हजार 465, संगमनेर 57 हजार 714, जामखेड 33 हजार 161, शेवगाव 35 हजार 479, श्रीगोंदा 28 हजार 326, श्रीरामपूर 80 हजार 992.
मतदान केंद्र संख्या
शिर्डी 36, राहुरी 35, राहाता 21, संगमनेर 61, जामखेड 37, शेवगाव 38, श्रीगोंदा 36, श्रीरामपूर 90.
नगरसेवक संख्या
शिर्डी 23, राहुरी 24, राहाता 20, संगमनेर 30, जामखेड 24, शेवगाव 24, श्रीगोंदा 22, श्रीरामपूर 34.
355 केंद्रावर 403 कंट्रोल व 824 बॅलेट युनिट
जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या नगराध्यक्षासह 189 सदस्यपदासाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. निवडणूक अधिकार्यांनी निश्चित केलेल्या 355 मतदान केंद्रावर 3 लाख 22 हजार 19 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार असून मतमोजणी उद्या सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणार आहे. आठ नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक शाखेने 355 मतदान केंद्रावर 403 कंट्रोल युनिट व 824 बॅलेट युनिट स्थापन केले आहेत. या मतदान केंद्रावर 3 लाख 22 हजार 19 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 लाख 62 हजार 455 महिला आहेत, 1 लाख 59 हजार 564 पुरुष व 66 तृतीयपंथी मतदार आहेत. या पालिकात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या 2 हजार 891 ने अधिक आहे.
मतदार प्रभावित होण्याची भीती
न्यायालयीन प्रक्रियेत उशीर झाल्याने चार पालिकेतील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. या ठिकाणी 20 डिसेंबर रोजी मतदान व 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. शिवाय आज मतदान होत असलेल्या चार पालिकातील 12 सदस्यपदांच्या जागेवर देखील स्थगित देण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी प्रभागातील दोन आणि नगराध्यक्षपदासाठी आज मतदान झाल्यानंतर लगेच उद्या 3 तारखेला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालाचा परिणाम 20 तारखेला होणार्या मतदानावर होण्याची शक्यता आहे.
बोटाला दोनदा लागणार शाई
स्थगिती देण्यात आलेल्या 7 पालिकांतील 12 ठिकाणी एक नगरसेवकपद व नगराध्यक्षपदासाठी मतदारांना आज मतदान करता येईल. त्यानंतर स्थगिती देण्यात आलेल्या जागेसाठी पुन्हा 20 डिसेंबरला मतदानाला जावे लागणार आहे. त्यामुळे 12 प्रभागातील मतदारांच्या बोटाला दोनदा मार्कर पेनची शाई लागणार आहे.
पुढे ढकललेल्या निवडणुकांमध्ये नव्याने उमेदवाराला अर्ज भरता येणार नाही, अर्ज मागे घेता येणार
जिथे जिथे निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्या ठिकाणच्या 24 निवडणूक अधिकार्यांना जिल्हाधिकार्यांना मार्फत अहवाल सादर करण्यास सांगितला असून कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची सूत्रांची माहिती आहे. पुढे ढकललेल्या निवडणुकांमध्ये नव्याने उमेदवाराला अर्ज भरता येणार नाही, फक्त अर्ज मागे घेता येणार आहे. चिन्ह वाटप आवश्यकतेनुसार होईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
न्यायालयांचे आज कामकाज बंद
नगरपरिषद व नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी 2 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालयीन कामकाज बंद राहणार असल्याची माहिती विधीज्ञ व विशेष सरकारी वकील अॅड. सुरेश लगड यांनी दिली. याबाबतचा आदेश जिल्ह्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांनी पारीत केला आहे.
श्रीरामपूरः प्रभाग ‘3 अ’ ची निवडणूक 20 डिसेंबरला
श्रीरामपूर शहरातील प्रभाग तीन अ हा अनुसूचित जाती (महिला) राखीव आहे. या मतदारसंघात अनिता ढोकणे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत प्रतिस्पर्धी उमेदवार रागेश्वरी रितेश एडके यांनी आक्षेप घेतला होता. त्याबाबत आयोगाने या जागेवरील निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. या जागेवर 20 डिसेंबर रोजी मतदान आणि 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या प्रभागातील मतदारांना नगराध्यक्ष आणि एक नगरसेवक पदासाठी असे दोनच मतदान करता येणार आहे.
लग्नतिथीमुळे उमेदवारांची कसरत
आजची लग्नतिथ सर्वत्र दाट असल्याने उमेदवार, त्यांचे समर्थक त्याचबरोबर मतदारांचा कस लागणार आहे. विवाह सोहळा महत्वाचा आहेच, त्यापेक्षाही मतदानाचा हक्क अतिशय महत्वाचा आहे. विवाह सोहळ्यांमुळे मतदार मतदान केंद्रापर्यंत कसे येतील याची काळजी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना घ्यावी लागणार आहे. तसेच वधू-वर तसेच वर्हाडी मंडळींनाही मतदानाचा हक्क बजवावा लागणार आहे.





