अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar
नगर जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अनेक भागात शेतीतून साधे पाणी वाहिले नाही. अपवाद वगळता अर्धातासापेक्षा अधिक काळ पाऊस झाला नाही. जिल्ह्यातील धरणमाथा वगळता अन्य ठिकाणी पावसासोबत भूगर्भातील पाण्याची स्थिती विदारक असून यंदाच्या पावसाळ्यात गेल्या चार महिन्यांत आतापर्यंत 25 दिवसांपेक्षा अधिक पावसाचे दिवस राहिलेले नाहीत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील 131 महसूल मंडळापैकी 112 मंडळात एक ते दोन महिने असा पावसाचा खंड आहे. पावसाअभावी यंदा खरीप हंंगामाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार असून रब्बी हंगामाची आशा धूसर असल्याचा अंदाज महसूल आणि कृषी विभाग प्रशासनाला आहे.
नगर जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. जून ते सप्टेंबरअखेर जिल्ह्यात सरासरी 448.1 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात 268.1 मिलिमीटर म्हणजेच अवघा 69 टक्के पाऊस झाला आहे. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात 24 ते 25 दिवसांपेक्षा अधिक पावसाचे दिवस राहिलेले नाहीत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील 131 महसूल मंडळांपैकी 112 मंडळांत एक ते दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीचा पावसाचा खंड राहिला आहे.
या पावसाच्या दीर्घ खंडाचा थेट परिणाम खरीप पिकांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. सोयाबीन, कपाशी, मका, बाजरी, मूग, उडीद यांसह अन्य खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असून रब्बी हंगामातील पेरण्यांवरही त्याचा परिणाम होणार आहे. महसूल आणि कृषी प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार रब्बीच्या पेरणीसाठी आवश्यक जमिनीतील ओलावा उपलब्ध होणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. नगर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बी हंगामाचा जिल्हा असून परतीच्या पावसावर मोठ्या प्रमाणात शेतीची भिस्त असते. मात्र, यंदा सुरुवातीपासूनच पावसाची स्थिती प्रतिकूल राहिल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणांचा अपवाद वगळता अन्य धरणांतील पाणीसाठ्याची स्थितीही चिंताजनक आहे.
राहुरी, श्रीरामपूर आणि नेवाशाला मोठा फटका
नगर जिल्ह्यात राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे एकूण सरासरीच्या 25 ते 50 टक्क्यांच्या आत पाऊस पडलेला आहे. यामुळे या तालुक्यात खरीप हंगामासह रब्बी हंगाम आणि उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. मात्र, या तालुक्यांना मूळा, भंडारदरा धरणाचा मोठा आधार असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे.
50 ते 75 टक्के पाऊस असणारे तालुके
तसेच नगर, शेवगाव, जामखेड, पाथर्डी, राहाता या तालुक्यात चालू वर्षी सरासरीच्या 50 ते 75 टक्के पाऊस झालेला आहे. यातील राहाता तालुका वगळता अन्य ठिकाणी शेतीसह पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चार्याचा गंभीर प्रश्न राहणार असून जिल्हा प्रशासनाला याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. जिल्ह्यात एकट्या अकोले तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे.
50 मंडळात दीड महिन्यांपेक्षा अधिक खंड
नगर जिल्ह्यात चालू पावसाळ्यात 131 महसूली मंडळापैकी 50 मंडळात 28 दिवस ते 40 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड राहिलेला आहे. तर 62 मंडळात 21 ते 28 दिवस म्हणजे सरासरी एक महिन्यांचा पावसाचा खंड राहिलेला आहे. यामुळे कडधान्य पिकांसह, सोयाबीन, कपाशी पिकांच्या पिकांच्या उत्पादानावर मोठा आणि दुरगामी परिणाम होणार आहे.
दहा दिवसात पंचनामे पूर्ण करणार- आशिया
नगर जिल्ह्यात पावसाअभावी पिकांची स्थिती आणि होणारा उत्पादनावरील परिणाम याबाबत सरकारकडून आदेश मिळताच शनिवारपासून थेट शेतकर्यांच्या बांधावर जावून पिकांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहे. सरकारच्या सुचनानूसार येत्या दहा दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उदिड आणि मूग पिकाच्या कापणीचे 300 पेक्षा अधिक प्रयोग पूर्ण झालेले असून उर्वरित पिकांचे पिक कापणी प्रयोग सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिली.
2 लाख 50 नागरिकांच्या घशाला कोरड
जिल्ह्यात सध्या 133 सरकारी पाण्याच्या टँकरव्दारे 2 लाख 50 हजारांहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. ऐन पावसाळ्यात ही बिकट स्थिती नगर जिल्ह्यात असून ऑक्टोबर महिन्यांत हा आकडा झपाट्याने वाढण्याचा अंदाज प्रशासनाला असून गेल्या काही दिवसात पावसाचा खंड यामुळे जमिनीतील ओल कमी होतांना दिसत असून मोठ्या पावसामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली दिसत नाही. जिल्ह्यात सध्या 133 सरकारी पाण्याच्या टँकरव्दारे अडीच लाख नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
गावोगावी टंचाई आराखड्याची लगबग
नगर जिल्ह्यात दरवर्षी नाव्हेंबर ते पुढील जनअखेर जिल्ह्यात निर्माण होणार्या संभाव्य पाणीटंचाईशी मुकाबला करण्यासाठी जिल्हा परिषद आणि महसूल प्रशासनाच्या मदतीने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाईकृती आरराखडा तयार करण्यात येतो. यंदा सप्टेंबर महिन्यांत जिल्ह्यात पाणीटंचाई सुरु असून यामुळे आतापासून गावोगावी सध्या पाणीटंचाई आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तीनपट म्हणजे सुमारे 75 ते 80 कोटींचा टंचाईनिवारणार्थ आराखडा तयार करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.




