अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
उन्हाच्या तीव्रतेने जिल्ह्यात अनेक गावे व वाड्यावस्त्यांतून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने टँकरसह मिळेल त्या जलस्रोतावर नागरिकांना अवलंबून राहावं लागत आहे. परिणामी नागरिकांना दूषित पाणीही प्यावे लागत आहे. गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणार्या योजनांच्या जलस्त्रोतांच्या पाणी नमुन्यांची तपासणी जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाने केली असता, गेल्या मार्च महिन्यात तब्बल 44 नमुने दूषित असल्याचे आढळले आहे.
राजूर (ता. अकोले) येथे दूषित पाण्यामुळे कावीळची साथ पसरून एका मुलीचा मृत्यू तर 126 रुग्ण आढळले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 44 गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळल्याची घटना उल्लेखनीय असल्याचे मानले जाते. गेल्या 1 मार्च 2024 पासून 31 मार्च 2025 या वर्षभराच्या कालावधीत 488 पाणी नमुने दूषित आढळल्याची माहिती आरोग्य विभागाकडून उपलब्ध झाली. जामखेड व कोपरगाव तालुक्यात एकाही गावचे पाणी नमुने दूषित आढळले नाही. इतर सर्व तालुक्यात पाणी नमुने दूषित आढळले. आरोग्य विभागाकडून दरमहा दोन वेळेला बायोमेट्रिक पध्दतीने व एकवेळेला रासायनिक पध्दतीने पाणी नमुने तपासले जातात. नमुने दूषित आढळल्यास संबंधित बीडीओ, ग्रामपंचायतीला कळवले जाते. त्यानुसार पाणी प्रक्रियेवर देखरेख ठेवून पुन्हा पाणी नमुने तपासले जातात.
राजुरमध्ये 8 एप्रिलला पाणी नमुने तपासण्यात आले, ते योग्य आढळले. मात्र 23 एप्रिलला प्रथम काविळीची साथ पसरल्याचे निदर्शनास आले. त्याचा जिल्हा परिषदेचे यंत्रणांनी शोध घेतला असता, राजुरजवळ यात्रा भरली होती, त्याच दरम्यान भंडारदर्याचे आवर्तन सुटले होते. यात्रेसाठी मोठी गर्दी झाली होती. गावची पाणीयोजना ‘एमजीपी’ने तयार केली. ती अद्याप ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झालेली नाही. या योजनेची शुध्दीकरण यंत्रणा बंद होती. त्याचा परिणाम काविळीची साथ पसरण्यात झाला असावा असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. शुध्दीकरण यंत्रणा कार्यान्वित करून दोन दिवस राजुरचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर परिसरातील गावांतील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
दूषित पाणी नमुने आढळलेली गावे
पिसेवाडी, वाडगी, ब्राम्हणवाडा, विठे, जामगाव, (अकोले), बारडगाव दगडी, बेलवंडी, येसवाडी (कर्जत), नारायणडोह, हिंगणगाव (अहिल्यानगर), देवसडे, जायगुडे आखाडा, दहिगाव (नेवासा), रेनवडी माजमपूर (पारनेर), उपजिल्हा रुग्णालय जोगेवाडी, मोहरी, कासार पिंपळगाव, एकनाथवाडी (पाथर्डी), अस्तगाव (राहता), ताहराबाद, धामोरी बुद्रुक, कोल्हार खुर्द, मल्हारवाडी, चिंचोली रामपूर, चांदेगाव (राहुरी), आश्वी खुर्द, खळी, सायखिंडी (संगमनेर), रांजणी (शेवगाव), चिखलठाणवाडी, पोराचीवाडी, अघोरीवाडी (श्रीगोंदे) तसेच खानापूर व मांडवे (श्रीरामपूर).