अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. यंदाच्या मिरवणुकीत महिलांचा सहभागही लक्षणीय होता. शहरातील मिरवणुकीत यंदा 7 संघटना डीजेसह सहभागी झाल्या होत्या. यात युवक आणि महिलांचा उत्साह अधिक होता. बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मिरवणूक सुरू झाली. रात्री 10 वाजता शांततेत मिरवणुकीची सांगता झाली. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर उपअधीक्षक अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मिरवणूक मार्गावर बॅरिकेटिंग करून रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. किरकोळ वाद वगळता रात्री 10 वाजता उत्साहात मिरवणुकीची सांगता झाली. शहरासह केडगाव, भिंगारमध्येही मिरवणूक उत्साहात पार पडली. कोतवाली पोलीस ठाण्याच्या पथकाकडून डीजेच्या आवाजाची पातळी तपासण्यात आली. यात सर्वच डीजेंनी आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे समोर आले. मिरवणूक संपल्यावर पोलिसांनी सर्व डीजे ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.