अहिल्यानगर (प्रतिनिधी)
शेतातील झाडे तोडण्याला विरोध केल्याच्या रागातून वृध्द दांपत्यास लोखंडी गज आणि कुर्हाडीने हल्ला केल्याची घटना अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा शिवारात बुधवारी (7 जानेवारी) सायंकाळी साडेचार व सहा वाजता सुमारास घडली आहे. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात तिघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विश्वनाथ संतू कुमटकर (वय 80, रा. पिंपळगाव लांडगा) यांनी फिर्याद दिली आहे. भानुदास संतु कुमटकर, ज्ञानदेव भानुदास कुमटकर, साहेबराव शंकर कुमटकर (सर्व रा. पिंपळगाव लांडगा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पिंपळगाव लांडगा शिवारातील गट नं. 165 मधील घरासमोर फिर्यादी उभे असताना संशयित आरोपी झाडे तोडत असल्याचे पाहून त्यांनी विरोध केला.
याचा राग मनात धरून संशयित आरोपी भानुदास कुमटकर, ज्ञानदेव कुमटकर आणि साहेबराव कुमटकर यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन संशयित आरोपींनी लोखंडी गज आणि कुर्हाडीने फिर्यादीच्या डोक्यावर व हातावर वार केले. या हल्ल्यात फिर्यादीसह त्यांची पत्नी जखमी झाले आहेत. पीडित कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.





