अहिल्यानगर (प्रतिनिधी)
सैन्यदलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोघा तरूणांची तब्बल 23 लाख 39 हजार 378 रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरूणांकडून लाखो रूपये उकळून त्यांना बनावट नियुक्तीपत्रे आणि निवडीचे ई-मेल पाठविण्यात आले.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी गणेश कारभारी थोपटे (रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची (21 ऑक्टोबरपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित अक्षय उत्तम हरणे (रा. नांदेड) याचा शोध सुरू आहे.
याबाबत ऋषिकेश महादेव गोल्हार (वय 25, रा. भाळवणी, ता. पारनेर) यांनी शनिवारी (17 ऑक्टोबर) फिर्याद दिली आहे. गोल्हार यांना सैन्यदलात नोकरी करण्याची इच्छा असल्याने ते भरतीचा सराव करीत होते. याचदरम्यान त्यांचा मित्र सौरव जन्हाड याने गणेश थोपटे हा एअर फोर्समध्ये पुणे येथे नोकरीला असून, तो सैन्यात नोकरी लावून देऊ शकतो, असे सांगितले. त्यानंतर गोल्हार यांनी थोपटे याच्याशी संपर्क साधला.
सावेडी येथील तहसील कार्यालयासमोर थोपटे याची गोल्हार यांच्याशी भेट झाली. त्यावेळी थोपटे याने अक्षय हरणे हा आपला ओळखीचा असून, तो डीआयजी पोस्टवर नोकरीला असल्याचे सांगितले. त्याच्या माध्यमातून सैन्यात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत सुरूवातीला दोन लाख रूपये रोख स्वरूपात घेतले. पैसे मिळाल्यानंतर आरोपींकडून गोल्हार यांना ई-मेलव्दारे निवड झाल्याचे सांगण्यात आले. निवड झाल्याचे भासवून सिक्युरिटी डिपॉझिट आणि डिमांड ड्राफ्टच्या नावाखाली आणखी पैशांची मागणी करण्यात आली. त्यानुसार गोल्हार यांनी वेळोवेळी फोन पे आणि ऑनलाइन माध्यमातून गणेश थोपटे, अक्षय हरणे आणि सौरव जन्हाड यांच्या खात्यांवर एकूण 13 लाख 29 हजार 378 रूपये जमा केले.
दरम्यान, गोल्हार यांचा मित्र अंकेश अशोक दावभट (वय 24, रा. पाडळी कान्हूर, ता. पारनेर) यांनाही आसाम रायफल्समध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यांच्याकडूनही आरोपींनी आठ लाख 10 हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली. अंकेश यांना आसाम रायफल्समध्ये असिस्टंट अकाउंटंट पदासाठी निवड झाल्याचे सांगत नियुक्तीपत्रही पाठविण्यात आले. मात्र, हे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे नंतर उघड झाले. दरम्यान, दोन्ही तरूणांनी नोकरीबाबत वारंवार विचारणा केली असता संशयित आरोपींकडून टाळाटाळ करण्यात येऊ लागली. काही दिवसांनी गणेश थोपटे आणि अक्षय हरणे यांनी फोन उचलणेही बंद केले. गोल्हार यांनी फिर्याद देताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून थोपटे याला अटक केली. पोलीस निरीक्षक परशुराम दळवी अधिक तपास करीत आहेत.




