Saturday, May 30, 2026
HomeनगरFake Milk : धसाळने तयार केलेले बनावट दूध शेटे-म्हसेच्या डेअरीला; एलसीबीच्या तपासात...

Fake Milk : धसाळने तयार केलेले बनावट दूध शेटे-म्हसेच्या डेअरीला; एलसीबीच्या तपासात दोघांचा सहभाग निष्पन्न

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

- Advertisement -

घातक क्रिमपासून बनावट दूध तयार करून ते आरडगाव (ता. राहुरी) येथील डेअरीमध्ये पुरवले आला जात असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून उघडकीस आहे. या प्रकरणात संबंधित डेअरीचे मालक रामचंद्र ऊर्फ राजू चिमाजी शेटे (रा. वळणपिंप्री, ता. राहुरी) आणि सर्जेराव मोहन म्हसे (रा. शिलेगाव, ता. राहुरी) यांना संशयित आरोपी करण्यात आले आहे. तसेच, अटकेत असलेल्या संतोष माधव धसाळ (रा. तांदुळवाडी, ता. राहुरी) याचा कामगार अक्षय मधुकर निकम (वय २४, रा. आरडगाव) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, राजू शेटे याचा सत्ताधारी पक्षाशी संबंध असल्याची चर्चा असून त्याच्या नावाचा या गुन्ह्यात समावेश झाल्याने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करत १४ फेब्रुवारी रोजी जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे छापा टाकला होता. या कारवाईत बनावट दूध तयार करण्याचा व्यवसाय उघडकीस आला. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे तपास करत आहेत. सुरूवातीला पोलिसांनी राहुरी तालुक्यातील दोघांसह तिघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत देवळाली प्रवरा येथे घातक क्रीम तयार केले जात असल्याचे समोर आले. तपासादरम्यान या बनावट दूध व्यवसायाचे जाळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड, श्रीगोंदा या तालुक्यांपर्यंत तसेच बीड आणि नाशिक जिल्ह्यांपर्यंत पसरले असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ४१ संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत.

पोलिसांनी पुढील तपासात किरणकुमार रोहकले (रा. श्रीरामपूर) आणि अर्जुन जगदाळे (रा. नेवासा) यांना अटक केली. त्यानंतर संतोष धसाळ याला बेड्या ठोकल्या. तो घातक क्रिमपासून बनावट दूध तयार करत असल्याचा संशय होता. त्याच्याकडे काम करणारा अक्षय निकम यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या सहभागाचे पुरावे मिळाल्याने त्यालाही अटक करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात सात संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.

धसाळ आणि निकम यांच्याकडून झालेल्या चौकशीत त्यांनी तयार केलेले बनावट दूध आरडगाव येथील राजू शेटे आणि सर्जेराव म्हसे यांच्या डेअरीमध्ये पुरवले जात असल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेटे व म्हसे यांना संशयित आरोपी केले असून त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणामुळे दूध व्यवसायासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून राजू शेटे व सर्जेराव म्हसे यांचा शोध सुरू आहे.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...