अहिल्यानगर (प्रतिनिधी)
स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) गेल्या चार ते पाच वर्षांपासून कोणत्याही अंमलदाराची नियमित नियुक्ती झालेली नाही. सध्या या शाखेचा संपूर्ण भार संलग्न अंमलदारांच्या खांद्यावर आहे.
दरम्यान, पूर्वी एलसीबीमध्ये सेवा बजावलेले काही अंमलदार पुन्हा एलसीबीत येण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. मात्र, अनेक अनुभवी व डिटेक्शनमध्ये हातखंडा असलेल्या अंमलदारांनी अशा ‘जुनी टीम’ पुन्हा एलसीबीत येण्याच्या हालचालींवर आक्षेप घेत नवीन चेहर्यांना संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.
प्रत्येक प्रशासकीय बदल्या वेळी अनेक अंमलदार एलसीबीमध्ये नियुक्तीसाठी अर्ज करतात. बदली दरबारातही ही मागणी सातत्याने समोर येत असते. मात्र, एलसीबीत नियुक्ती मिळविण्यासाठी ‘वशिला’ किंवा राजकीय पाठबळ नसलेल्या अंमलदारांची दखल घेतली जात नाही, अशी नाराजी पोलीस दलात आहे. एलसीबीमध्ये काम करण्यास पात्र असूनही केवळ राजकीय वजन नसल्यामुळे अनेकांची उपेक्षा होते.
दरम्यान, सध्या एलसीबीचा कारभार सायबर पोलीस ठाण्यात नेमणूक असलेल्या, पण एलसीबीसाठी संलग्न करण्यात आलेल्या आणि इतर पोलीस ठाण्यातून संलग्न करण्यात आलेल्या अंमलदारांमार्फतच सुरू आहे. काही अंमलदारांची बदली करूनही ते नियुक्तीच्या ठिकाणी कार्यमुक्त झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नुकतीच एलसीबीचे प्रभारी अधिकारी बदलून किरणकुमार कबाडी यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. लवकरच संलग्न अंमलदारांची कार्यमुक्ती आणि नव्या अंमलदारांची नियुक्ती अपेक्षित आहे.
विशेष म्हणजे, काही पूर्वी एलसीबी केलेले अंमलदार पुन्हा नियुक्तीसाठी ‘फिल्डिंग’ लावत असल्याचेही समजते. या अंमलदारांना बाजूला सारून नवोदित, कार्यक्षम व निष्पक्ष अंमलदारांना संधी द्यावी, अशी जोरदार मागणी आता पोलीस दलातूनच होत आहे. एलसीबीमध्ये नियुक्ती मिळाल्यास ‘मलिदा’ मिळतो, अशी भावना निर्माण झाली असून, त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी अधीक्षक घार्गे यांनी निर्णायक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.
पोलीस दलातील काही जाणकारांचे मत आहे की, एलसीबीसाठी अंमलदारांची निवड करताना त्यांच्या पोलीस ठाणे स्तरावरील कामगिरीचा सखोल आढावा घेण्यात यावा. मात्र, पूर्वी एलसीबी केलेल्या अंमलदारांना पुन्हा संधी देणे टाळून नव्या चेहर्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यामुळे एलसीबीची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल.
नव्या चेहर्यांना संधी द्यावी
एलसीबीच्या कार्यपध्दतीवर याआधी अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामुळे एलसीबीची प्रतिमा डागाळली गेली आहे. त्यामुळे, जुनेच अंमलदार पुन्हा नियुक्त केल्यास हा संदेश पोलीस दलात चुकीचा जाईल. परिणामी, नव्या व प्रामाणिक अंमलदारांना एलसीबीसारख्या शाखेत काम करण्याची संधी मिळणार नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.
त्याचे मनसुबे हाणून पाडावेत
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वी एलसीबीत काम केलेला ‘शंकर’ नावाचा एक अंमलदार आपली जुनी टीम पुन्हा एलसीबीत आणण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी त्याने वरिष्ठ अधिकार्यांकडे ‘फिल्डिंग’ लावल्याचे समजते. मात्र, त्याचे हे मनसुबे अधीक्षक घार्गे यांनी वेळीच हाणून पाडावेत, अशी अपेक्षा अंमलदारांमधून व्यक्त होत आहे.





