कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता’ अशी अवस्था झालेल्या नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्यांनी पुन्हा एका होतकरू तरुणाचे जीवन हिरावून घेतल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास, येवला नाका, बजाज शोरूम समोर घडली. या अपघातात आदित्य कैलास देवकर (वय 28, रा. इंदिरापथ, कोपरगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमा झाली.
नगर-मनमाड महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. हा महामार्ग जणू मृत्युचा सापळा बनला असून पडलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील स्ट्रीटलाईट बंद असल्याने वाहन चालकांना रस्ता ओळखणे कठीण झाले आहे. याच कारणामुळे आदित्य कैलास देवकर हा तरुण या मार्गावर आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना खड्ड्याच्या बाजूला पडला असता त्यावरून अज्ञात वाहन गेले असल्याचे समजते. या भीषण धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. वर्षानुवर्षे हा रस्ता अपघातांचा काळा ठिपका बनला आहे. दरवर्षी अनेक तरुणांचा या महामार्गावर बळी जात आहे. तरीही संबंधित विभाग आणि प्रशासनाकडून रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्यात येत नसल्याबद्दल नागरिकांनी निषेध व्यक्त केला. स्थानिकांनी या अपघातानंतर तातडीने खड्डे बुजविण्याची आणि रस्त्यावर योग्य प्रकाशव्यवस्था बसविण्याची मागणी केली आहे.
संतप्त नागरिकांचा रास्ता रोको
आदित्य कैलास देवकर याचा मंगळवारी रात्री बळी गेल्यानंतर बुधवारी सकाळी संतप्त नागरिकांनी घटनास्थळी जाऊन रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी दीपक वाजे, अनिल गायकवाड, विनय भगत, गगन हाडा, बालाजी गोर्डे, भरत मोरे, सुनील साळुंके, विजय खैरनार, संकेत पारखे, वासुदेव शिंदे आदी नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. अपघातास कारणीभूत बांधकाम विभागाचे अधिकारी असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. रस्ता दुरुस्तीसाठी तरुणांनी थाळी हातात घेऊन पैसे जमा केले. या रास्ता रोकोमुळे नगर-मनमाड रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती.




