अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर ते मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील सावळीविहीर ते विळदघाट दरम्यान सुमारे 75 किलोमीटर अंतराच्या कॉक्रीटीकरण व दुरूस्तीच्या कामामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या मार्गावरील विळदघाट ते सावळीविहीरकडे जाणारी एक लेन अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. अवजड वाहनांची वाहतूक आता एक महिन्यासाठी पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे.
दि. 12 सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेले हे काम अजूनही सुरू असून, यापूर्वी देखील हा महामार्ग अवजड वाहतुकीसाठी वारंवार बंद करण्यात आला होता. मात्र या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात ट्रक, ट्रॅव्हल्स व कंटेनर वाहतूक होत आहे. दरम्यान, मौजे संवत्सर (ता. कोपरगाव) येथील गोदावरी नदीवरील पूल धोकादायक स्थितीत असल्याने वाहतुकीची कोंडी व अपघातांची शक्यता वाढल्याचे प्रशासनाचे निरीक्षण आहे. त्यामुळे जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी खबरदारीचा उपाय म्हणून दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री आठ वाजल्यापासून ते दि. 11 डिसेंबर 2025 रोजी रात्री आठ वाजेपर्यंत एक लेन अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला असून तो पुढील प्रमाणे असेल- अहिल्यानगरकडून राहुरी, शिर्डी, मनमाड, मालेगाव, धुळेच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक : विळद सर्कल- दुधडेरी चौक- शेंडी बायपास- नेवासा फाटा- कायगाव टोके- गंगापूर- वैजापूर मार्गे मनमाड. तसेच अहिल्यानगर कडून संगमनेर, नाशिकच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक : कल्याण बायपास- आळेफाटा- संगमनेर मार्गे पुढे नाशिक. सदर आदेश शासकीय वाहने, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड तसेच अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.
महामार्गांची दयनीय अवस्था
वाहतूक वळविण्याच्या निर्णयामुळे अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अवजड वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे. एकीकडे मनमाड महामार्गाचे काम दीर्घकाळ पूर्ण न झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर महामार्गाचीही अवस्था अत्यंत खराब झाल्या आहे. यामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे, दुरूस्तीअभावी निर्माण झालेली धुळीची समस्या आणि वाहनांमध्ये होणारा बिघाड यामुळे वारंवार वाहतूक कोंडी तसेच अपघातांची शक्यता वाढली आहे. स्थानिक नागरिक व वाहनचालक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने या महामार्गांवरील कामे युध्दपातळीवर पूर्ण करावीत, अशी मागणी केली आहे.




