
अहिल्यानगर । प्रतिनिधी
विधान परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी श्रीरामपूरचे युवानेते करण ससाणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. अपक्ष अर्जासोबतच त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीनेही उमेदवारी अर्ज नेला आहे. दरम्यान, मुंबईत महाविकास आघाडीच्या जागावाटपात नगरची जागा काँग्रेस लढविणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यामुळे नगरमधून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून करण ससाणे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, भाजपकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे भाजपात येत असून त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहे. असे झाल्यास ही लढत तनपुरे विरुद्ध ससाणे अशीच रंगण्याची चिन्हे आहेत.
विधान परिषदेच्या या जागेसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार असून, २२ जून रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात ४६१ मतदार (नगरसेवक) आहेत. यामध्ये एकट्या भाजपचे २०७ मतदार आहेत. महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे नाव भाजपकडून अंतिम झाल्याची चर्चा आहे. आज शनिवारी मुंबईत तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असून, त्यानंतर सोमवारी ते भाजपच्या वतीने अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शुक्रवारी श्रीरामपूरचे माजी आमदार स्वर्गीय जयंत ससाणे यांचे चिरंजीव करण ससाणे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारी अर्जावर नगरसेवक दिलीप नागरे, मुझफ्फर शेख, राजेंद्र पवार, रईस शेख, योगेश जाधव, कांचन सानप, निलोफर शेख, वैशाली पोटे, योगिता नागले आणि गोपाल लिंगायत यांच्या अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या आहेत. अपक्ष अर्ज दाखल करण्यासोबतच ससाणे यांनी काँग्रेस पक्षाचाही उमेदवारी अर्ज घेतला असून, श्रीरामपूरचे रवींद्र भांबारे यांनी हा अर्ज नेला आहे.
इतर इच्छुकांनीही नेले अर्ज
शुक्रवारी ससाणे यांच्या व्यतिरिक्त प्रदीप खामगळ (श्रीगोंदा) यांनी एक, भाऊसाहेब मांडे (श्रीगोंदा) यांनी एक आणि दत्त-ात्रय पानसरे (श्रीगोंदा) यांच्यासाठी संकेत दरेकर व चैतन्य आगरकर यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज नेला आहे. आतापर्यंत नगरच्या विधान परिषदेच्या या एका जागेसाठी एकूण २७ इच्छुकांनी ३९ उमेदवारी अर्ज नेले आहेत.
मतदार यादीत दुरुस्तीसाठी १६ अर्ज दाखल
जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीची प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर, ४६१ मतदारांपैकी १६ जणांनी मतदार यादीतील चुकीचे नाव, लिंग किंवा जन्म तारीख यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडे अर्ज केले आहेत. या दुरुस्तीसाठी आवश्यक ते पुरावेही सादर करण्यात आले असून, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यावर अंतिम निर्णय घेणार आहेत. दुरुस्तीसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये महानगरपालिका ३, राहुरी ७, श्रीरामपूर २, संगमनेर ३ आणि श्रीगोंदा येथील १ अशा एकूण १६ मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील महानगरपालिका, छावणी परिषद, नगरपरिषदा व नगरपंचायतींचे सदस्य मतदार म्हणून सहभागी होणार आहेत. नगर महानगरपालिका, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, श्रीगोंदा, शिर्डी, शेवगाव, नेवासे, कर्जत, अकोले, जामखेड व पारनेर येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचा या निवडणुकीत मतदार म्हणून समावेश आहे. एकूण ४६१ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत. नावात चूक, पत्ता, वय, लिंग आणि जन्मतारखा चुकीच्या असणे अशा स्वरूपाच्या ३१ दुरुस्त्या सूचविण्यात आल्या आहे. श्रीगोंदे नगरपरिषदेच्या नगरसेवकांच्या जन्म तारखेत महिन्याचा उल्लेख अगोदर आल्याने २५ नगरसेवकांच्या जन्म तारखा चुकीच्या आल्या होत्या. नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी याबाबत पत्र दिले आहे. महापालिका ३, राहुरी ७, संगमनेर २, श्रीरामपूर ३ आणि श्रीगोंदे एक अशा एकूण ४१ दुरुस्त्या सूचविण्यात आल्या आहेत.
प्राजक्त तनपुरे यांनी घेतली सुप्रिया सुळे यांची भेट; भाजप प्रवेशाबाबत दिली कल्पना
राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शुक्रवारी दुपारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण (वाय. बी.) सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. मतदारसंघातील राजकीय अडचणींमुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची कल्पना त्यांनी सुळे यांना दिली असून, हा त्यांचा राष्ट्रवादीला अखेरचा दंडवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आज शनिवारी तनपुरे कार्यकर्त्यांसह मुंबईत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीपासूनच तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर, भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सर्वप्रथम रंगली. ही चर्चा अखेर खरी ठरणार असून, शुक्रवारी मुंबईत तनपुरे यांनी समर्थकांसह खासदार सुळे यांची भेट घेऊन आपल्या भाजप प्रवेशावर चर्चा केली. मतदारसंघातील बिकट परिस्थिती आणि राजकीय अडचणींमुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सुळे यांना आवर्जून सांगितले. यावेळी उभय नेत्यांमध्ये सुमारे दीड ते दोन तास सविस्तर चर्चा झाली.
दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे आणि राहुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.




