अहिल्यानगर । प्रतिनिधी
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजल्यापासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासांत, म्हणजेच सकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत शहरात सरासरी ७.८७ टक्के इतके मतदान झाले असून मतदारांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
प्रशासनाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, सकाळी ९:३० वाजेपर्यंत एकूण २४,१७५ मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये १२,६०८ पुरुष आणि ११,५६७ महिला मतदारांचा समावेश आहे. सकाळी थंडीचा कडाका असूनही मतदानाची टक्केवारी समाधानकारक मानली जात आहे.
गुलमोहर रस्त्यावरील आनंद विद्यालय शाळेत सकाळी ९:३० च्या सुमारास मतदारांचा ओघ वाढू लागला होता. मतदान करून बाहेर पडल्यानंतर अनेक मतदार, विशेषतः तरुण, आपला ‘इन्क्ड सेल्फी’ घेताना दिसले. शहराच्या विविध भागांत अनेक नागरिक सहकुटुंब मतदानासाठी बाहेर पडले होते. काही केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक आणि अपघातात जखमी झालेल्या मतदारांनी चक्क वॉकरचा आधार घेऊन मतदान केंद्रावर हजेरी लावली, जे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले.
सावेडी येथील समर्थ विद्या मंदिर शाळेत सकाळी ७:३० वाजल्यापासूनच मतदारांनी गर्दी केली होती. येथे एकूण सहा केंद्रांची सोय करण्यात आली असून, बहुतांश केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. आपला प्रभाग आणि केंद्र शोधण्यासाठी मतदार तेथे तैनात असलेल्या बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांची मदत घेताना दिसले. तसेच, प्रेमराज सारडा महाविद्यालय परिसरातील केंद्रांवरही मतदारांची वर्दळ सुरू होती.
मतदान प्रक्रिया सुरू असतानाच काही ठिकाणी तक्रारींचे प्रकारही समोर आले आहेत. अपक्ष उमेदवार जयंत यलूरकर यांनी काही केंद्रांवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी थेट घुसून हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यलूरकर यांनी यावरून निवडणूक प्रशासनाला जाब विचारत धारेवर धरले. त्यांनी घटनास्थळी भेट देण्यासाठी आलेल्या पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे यासंदर्भात तोंडी तक्रार केली.
तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले. कोणताही अनधिकृत व्यक्ती मतदान केंद्रात हस्तक्षेप करणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच, उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या मर्यादेबाहेर राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून, कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरू आहे.




