अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर पोलिसांनी मोठी आणि निर्णायक कारवाई करत तब्बल 1 हजार 231 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीपूर्वीच पोलिसांनी शहर ‘कंट्रोल’मध्ये आणत रेकॉर्डवरील गुन्हेगार, संशयित, अवैध धंदे करणारे व संभाव्य गैरवर्तन करणार्यांना थेट कागदावर घेतले आहे.
महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असून 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज (शुक्रवार) संपत असून उद्या (शनिवार) पासून प्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात होणार आहे. या काळात नेत्यांच्या सभा, चौक सभा, घरोघरी प्रचार मोठ्या प्रमाणात होणार असल्याने निवडणूक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी पोलिसांनी आधीच कडक पावले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत ही व्यापक कारवाई करण्यात आली.
निवडणुकीत अडथळा आणण्याची शक्यता असलेल्या 668 संशयितांकडून भारतीय न्याय संहिता कलम 126 नुसार चांगल्या वर्तणुकीचे बॉन्ड घेण्यात आले. तसेच दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या 63 रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून कलम 129 नुसार बॉन्ड लिहून घेण्यात आला आहे. निवडणूक काळात रात्री उशिरापर्यंत हॉटेल, दुकाने सुरू राहिल्याने गर्दी होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी 477 चालक व मालकांना भारतीय न्याय संहिता कलम 168 (2) नुसार नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अवैध दारू विक्री करणार्या 16 संशयितांना मुंबई प्रोव्हेटीव्ह अॅक्ट 93 नुसार नोटीस बजावण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 नुसार सहा गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले असून, शिक्षा भोगून आलेल्या एका गुन्हेगारालाही कलम 57 नुसार शहराबाहेर काढण्यात आले आहे. एकूणच, निवडणूक काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, मतदार भयमुक्त वातावरणात मतदान करू शकावेत आणि प्रचार शांततेत पार पडावा, यासाठी शहर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. प्रचाराच्या आधीच झालेली ही धडक कारवाई म्हणजे निवडणूक काळात गैरवर्तन करणार्यांसाठी स्पष्ट इशारा मानली जात आहे.




