अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्यांच्या थकबाकी वसुलीसाठी संबंधितांना नोटीस देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मार्केट विभागाच्या पथकाने गुरूवारी सहाय्यक आयुक्त सपना वसावा यांच्या नेतृत्वाखाली सर्जेपुरा येथील रंगभवन व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळेधारकांवर जप्ती कारवाईचा बडगा उगारतच 20 गाळेधारकांनी थकीत रकमेचा धनादेश जमा केला आहे.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार शहरातील महानगरपालिकेच्या गाळे, खोल्या, कार्यालये आदींकडे असलेल्या भाड्याच्या थकीत वसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. थकबाकीदार गाळेधारकांना यापूर्वीच जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीसीची मुदत संपल्यानंतर आता मार्केट विभागाकडून जप्ती कारवाई व वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुरूवारी (21 ऑगस्ट) पथकाने सर्जेपुरा रंगभवन व्यापारी संकुलातील 39 थकबाकीदारांपैकी 20 गाळेधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. या 20 गाळेधारकांनी कारवाई टाळण्यासाठी 48.96 लाख रूपयांची थकबाकी धनादेशाव्दारे जमा केली आहे.
दरम्यान, महानगरपालिकेने सर्वच थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाई सुरू केली आहे. सुमारे 25 कोटींची थकबाकी आहे. नोटीसा बजावूनही थकबाकी भरत नसतील तर आता कठोर कारवाई करण्याशिवाय महानगरपालिकेकडे पर्याय नाही. सर्व थकबाकीदारांना अनेकवेळा आवाहन करूनही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जप्ती कारवाई सुरू करण्यात आली आहे.
धनादेश न वटल्यास फौजदारी
महापालिकेने थकबाकीपोटी नोटीस दिल्या आहेत. तरीही गाळेधारकांकडून थकबाकी भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे कारवाई सुरू करण्यात आली आहे. कारवाई टाळण्यासाठी तत्काळ थकीत भाडे जमा करावे, असे आवाहन करतानाच वसुलीवेळी दिलेले धनादेश न वटल्यास तत्काळ गाळा ताब्यात घेऊन फौजदारी खटला दाखल केला जाईल, असा इशाराही डांगे यांनी दिला आहे.





