अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहराच्या पाणीपुरवठा योजना व वितरण व्यवस्थेवर होणार्या खर्चात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दुसरीकडे गेल्या 21 वर्षांपासून पाणीपट्टी वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न व पाणी योजना व वितरण व्यवस्थेवर होणार खर्च यातील तफावत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, पाणी योजनेची वीज बिले देण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. शहराची पाणीपुरवठा योजना व वितरण व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी महानगरपालिकेने घरगुती वापराच्या पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
पाणीपुरवठा विभागाच्या प्रस्तावानुसार स्थायी समितीने घरगुती वापराच्या पाणीपट्टीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेकडे पाठवण्यात आला आहे. यापूर्वी महानगरपालिकेने सन 2003 मध्ये पाणीपट्टीमध्ये वाढ केली होती. तेव्हापासून अर्धा इंच नळ कनेक्शनसाठी 1500 रूपये दर आकारला जात आहे. शहर पाणी पुरवठा योजनेसह वितरण व्यवस्था चालविण्याकरिता येणारा वीज बिल, दैनदिन देखभाल व दुरूस्ती, आस्थापना खर्च यात मात्र कित्येक पटीने वाढ झाली आहे. शहरात घरगुती वापर नळ कनेक्शनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव दरवर्षी मंजुरीसाठी सादर करण्यात येत होते. मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नव्हता.
पाणीपुरवठा योजना स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून महासभेने दिलेल्या मंजुरीनुसार घरगुती वापर पाणीपट्टी दरवाढ वगळता व्यावसायीक वापर, औद्योगिक वापर इत्यादी पाणी दरामध्ये यापूर्वीच दरवाढ लागू केलेली आहे. मात्र, त्यामुळे उत्पन्न वाढीत फारसा फरक पडलेला नाही. या सर्व बाबींचा विचार करून सन 2025-2026 पासून घरगुती पाणीपट्टीमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
असा असेल दर
पाणीपुरवठा विभागाच्या प्रस्तावानुसार स्थायी समितीने घरगुती वापराच्या पाणीपट्टीत अर्धा इंच कनेक्शनसाठी तीन हजार, पाऊण इंच कनेक्शनसाठी सहा हजार व एक इंच कनेक्शनसाठी 10 हजार रुपये दर निश्चित केला आहे. तसेच हद्दीबाहेरील मीटरव्दारे होणार्या पाणी पुरवठ्यासाठी 20 रुपये प्रतिहजार लिटर व शहरात मीटरव्दारे पाणी पुरवठ्यासाठी 10 रुपये प्रति हजार लिटर दर निश्चित करून प्रस्ताव मंजूर केला आहे.
शहराच्या पाणीपुरवठा योजना व वितरण व्यवस्थेवर होणार्या खर्चात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या खर्चामुळे पाणीपट्टी वाढवणे गरजेचे असून नागरिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे.
– यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक.