अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
ऐतिहासिक अहमदनगर शहराचे नाव आता ‘अहिल्यानगर’ झाले असून नामांतराच्या अंमलबजावणीला महानगरपालिकेकडून सुरूवात झाल्याचे काल, रविवारी दिसून आले. जुन्या महानगरपालिकेच्या ठिकाणी ‘अहिल्यानगर महानगरपालिका अहिल्यानगर’ असा स्वागताचा फलक लावण्यात आला आहे. दरम्यान, पुढील आठ दिवसांमध्ये नामांतराच्या अंमलबजावणीची प्रक्रिया पूर्ण होईल असे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. अहमदनगरचे अहिल्यानगर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर शुक्रवारी (4 ऑक्टोबर) राजपत्र प्रसिध्द केले गेले.
मात्र नामांतराची अंमलबजावणी संदर्भात पुढील प्रक्रिया स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. याची सुरूवात रविवारपासून झाल्याचे दिसून आले. जुन्या महानगरपालिकेचा स्वागत फलक रविवारीच बदलण्यात आला होता. त्या ठिकाणी ‘अहिल्यानगर महानगरपालिका अहिल्यानगर’ असा फलक लावण्यात आला आहे. शहरात सर्वत्र अहिल्यानगर नावाचे फलक लावण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. नामांतराच्या अंमलबजावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यास पुढील आठ दिवस लागतील असे आयुक्त डांगे यांनी सांगितले. दरम्यान, शहरात महानगरपालिकेकडून ही प्रक्रिया केली जात असली तरी जिल्हा व तालुक्याचे नाव बदलण्याबाबत महसूल विभाग नोटिफिकेशन काढेल व त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.