अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सोमवारपासून सुरू करण्यात आलेली अतिक्रमणवरील कारवाई मंगळवारी दुसर्या दिवशीही सुरू होती. महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने लालटाकी परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात असलेली पत्र्याची शेड व टपर्या कारवाई करून हटवल्या. दरम्यान, कितीही दबाव आला तरी अतिक्रमणांवरील कारवाई थांबणार नाही असा स्पष्ट इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
आयुक्त डांगे यांच्या आदेशानुसार सोमवारपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. सोमवारी नंतर मंगळवारीही कारवाई करण्यात आली. दरम्यान, काही अतिक्रमणधारकांनी आयुक्त यशवंत डांगे यांची मनपात येऊन भेट घेतली. समाज उपयोगी कामांसाठी बांधण्यात आलेल्या शेड काढू नये असे, त्यांनी सुचवले. मात्र रस्त्याला अडथळा ठरणारी, रस्त्यावर बांधण्यात आलेली कोणतीही अतिक्रमणे ठेवता येणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.