Saturday, May 24, 2025
HomeनगरAhilyanagar News : शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Ahilyanagar News : शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अकोले | प्रतिनिधी | Akole

- Advertisement -

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) किश्तवाड सेक्टर येथे सुरू असलेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांशी (Terrorists) झालेल्या चकमकीत शहीद झालेले ब्राह्मणवाडा (ता. अकोले) गावचे सुपुत्र संदीप पांडुरंग गायकर (Sandeep Pandurang Gaykar) यांच्यावर शनिवारी (दि. 24) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. हजारो नागरिकांनी साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तर ब्राम्हणवाडा येथे शहीद जवान संदीप गायकर यांचे स्मारक उभारण्याची ग्वाही त्यांनी दिली.

संदीप गायकर (वय 32) हे लष्कराच्या 15 मराठा लाईट इन्फंट्रीमधील 17 राष्ट्रीय रायफल्समध्ये सैनिक पदावर कार्यरत होते. किश्तवाड सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गुरुवारी (दि. 22) कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव ब्राह्मणवाडा येथे आणण्यात आले. लष्कर व स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात येथील ज्या विद्यालयात ते शिकले त्या सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.

यावेळी बोलताना जलसंपदा तथा पालकमंत्री विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, शहीद जवान संदीप गायकर यांनी जम्मू-काश्मीर येथे अतिरेक्यांच्या कारवाईत प्राणांची आहुती दिली. त्यांचा जीवनप्रवास हा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. देशाकरिता स्वतःला समर्पित केले. त्यांच्या जाण्याचे सर्वाँना दुःख आहेच, पण दुसरीकडे सर्वाँना अभिमान वाटावा असे त्यांचे कार्य आहे. त्यांचे प्रेरणादायक स्मारक ब्राह्मणवाडा येथे उभारले जाईल. संपूर्ण देश, प्रशासन त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून कुटुंबियांना शासन सर्वतोपरी मदत करेल, अशा शब्दांत त्यांनी श्रध्दांजली अर्पण केली. विश्व हिंदू परषदेचे राष्ट्रीय महामंत्री शंकर गायकर यांनी वीर जवान संदीप गायकर यांचे बलिदान व्यर्थ जाणार नसून प्रत्येक घराघरात संदीप गायकर तयार होऊन त्यांच्या प्राणांची किंमत मोजायला लावल्याशिवाय शांत बसणार नाही असा विश्वास व्यक्त करत श्रध्दांजली अर्पण केली.

दरम्यान, जवान संदीप गायकर हे वयाच्या विसाव्या वर्षी सैन्य दलात भरती झाले होते. त्यांनी गांधीनगर, जम्मू व काश्मीरमधील पुंछ सेक्टर, 56 राष्ट्रीय रायफल्स, मध्य प्रदेशमधील घाना सागर व यूनायटेड नेशन्स येथे सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. याप्रसंगी आमदार डॉ. किरण लहामटे, अमोल खताळ, माजी आमदार वैभव पिचड, माजी खासदार सदाशिव लोखंडे, रोहित भाऊसाहेब वाकचौरे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे, लष्कराच्यावतीने कर्नल केतन प्रसाद, तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भास्कर तळेकर, रोटरी क्लब, अगस्ति देवस्थान, वारकरी संघटनेच्यावतीने दीपक महाराज देशमुख, पत्रकार संघाच्यावतीने अमोल वैद्य, अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश नाईकवाडी, उपसरपंच सुभाष गायकर यांनीही शहीद जवान संदीप गायकर यांना पुष्पहार अर्पण केला.

भारतीय लष्कराच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. भारत माता की जय, शहीद जवान संदीप गायकर अमर रहे, वन्दे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मुलगा रिहांस याने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी संदीप गायकर यांच्या पत्नीने ‘भारत माता की जय’ची घोषणा दिल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. यावेळी आजी-माजी सैनिक, ग्रामस्थ व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

महामार्गावर

राज्य महामार्गावर ‘या’ गाड्यांची टोलपासून मुक्तता होणार; समृध्दी महामार्ग, शिवडी-न्हावा शेवा...

0
मुंबई | Mumbai पेट्रोल, डिझेलच्या वाहनांमुळे होणाऱ्या वाढणाऱ्या प्रदुषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी विद्युत वाहनांचे उत्पादन व वापराला मोठ्या प्रमाणावर चालना...