Tuesday, March 25, 2025
Homeनगर9 तालुक्यांना ‘नायट्रेट’चा विळखा !

9 तालुक्यांना ‘नायट्रेट’चा विळखा !

सहा तालुक्यांत काही गावांनी धोक्याची पातळी ओलांडली

अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar

युरियाच्या अतिवापरासह अन्य कारणामुळे नगर जिल्ह्यातील 9 तालुक्यातील विविध गावांमध्ये 100 पाणी नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. परिणामी या गावातील जनतेच्या आरोग्याभोवती नायट्रेटचा फास आवळला जात असून यासाठी आरोग्यासाठी संजीवनी असणारे पाणीच घातक होताना दिसत आहे. भूजल विभागाच्या नगरच्या प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या पाणी नमुना तपासणीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. नायट्रेटचा वाढता विळखा असणार्‍या तालुक्यात पारनेर, नगर, संगमनेर, अकोले, श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी, शेवगाव आणि श्रीरामपूर तालुक्यातील गावांचा समावेश आहे.

- Advertisement -

तर नगर तालुक्यातील 2, संगमनेर 8, अकोला, शेवगाव, श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यातील गावांमधील प्रत्येकी एका स्त्रोतात हे प्रमाण हे 40 ते 49 मिलीग्राम असल्याचे दिसून आले असून ते धोकादायकतेच्या उच्चतमपातळीवर आहे. भूजलासह पाण्याच्या स्त्रोतात वाढत्या नायट्रेटच्या प्रमाणास युरियासह अन्य रासायिनक खते, किटकनाशकांचा अतिरिक्त वापर आणि अन्य कारणे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. मात्र, कारणे काहीही असली तरी पाण्यातील वाढत्या नायट्रेटसह क्षारांचे वाढलेले प्रमाण, पाण्यातील वाढता टीडीएस, पीएच ही मानवासह जनावरांच्या आरोग्यासाठी चिंतेचे कारण बनताना दिसत आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या काही वर्षात युरीयासह अन्य रासायनिक खतांचा अतिरेकी वापर सुरू आहे. वाढलेला रासायनिक खतांचा वापर हा जमीन आणि पर्यावरणासाठी घातक ठरू लागला असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

नगरच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने मान्सूनपूर्व व मान्सूनपश्चात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावामधील विहिरी, कूपनलिकांसह जलस्रोतांच्या ठिकाणावरून पाण्याचे नमुने घेऊन तपासले जातात. यात 9 तालुक्यातील विविध गावात नायट्रेटचे प्रमाण हे प्रतिलिटर 30 ते 49 मिलिग्रॅम असल्याचे दिसून आले आहे. यावरून या गावात नायट्रेट प्रमाण वाढीचा विळखा घट्ट होतांना दिसत आहे.

प्रतिलिटर नायट्रेट 30 ते 49 मिलीग्राम
पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे सुरक्षित प्रमाण प्रतिलिटर 45 मिलिग्रॅमपेक्षा जास्त नसावे. मात्र, भूजल विभागाच्या प्रयोग शाळेत करण्यात आलेल्या तपासणीत जिल्ह्यातील 9 तालुक्यांतील विविध गावांतील 100 पाणी स्त्रोतात हे प्रमाण 30 ते 49 असल्याचे दिसून आले आहे. यामुळे या गावात पाण्यातील नायट्रेटचा विळखा घट्ट होतांना दिसत आहे. यात पारनेर तालुक्यातील 5 स्त्रोत, नगर 6, संगमनेर 15, अकोले 4, श्रीगोंदा 5, जामखेड 7, पाथर्डी 29, शेवगाव 28 आणि श्रीरामपूर तालुक्यातील 1 पाणी स्त्रोताचा समावेश आहे. प्रथमदर्शनी ही गावे नायट्रेट उद्रेकाच्या काठावर असल्याचे दिसत आहे.

असे वाढते प्रमाण
नैसर्गिकरीत्या जमिनीमध्ये असणार्‍या नायट्रोसोमोनास नावाच्या जिवाणूमुळे नायट्राइटया घटकामध्ये रूपांतरित होते. यानंतर लगेचच नायट्रोबॅक्टर नावाच्या आणखी एका जिवाणूमुळे नायट्राइटचे रूपांतर नायट्रेट या आयनामध्ये होते. शेतातील पिके नत्र हे याच नायट्रेट स्वरूपात घेतात. युरिया खत पिकांना टाकतो तेव्हा पिकांची मुळे त्याला अन्न म्हणून शोषून घेतात. हा नायट्रेट घटक आयन स्वरूपात असल्यामुळे जमिनीमध्ये अतिशय जास्त चल स्वरूपात असतो. हा नायट्रेट जमिनीत पाण्यासोबत झिरपून जातो आणि जमिनीतील भूगर्भातील पाण्यामध्ये मिसळतो. नाले, ओढा यांच्यामार्फत नद्यांमध्येदेखील मिसळतो. त्यातूनच पिण्याच्या पाण्यात नायट्रेटमुळे प्रदूषण होते.

नायट्रेटमुळे रक्तातील ऑक्सिजनचे घटते
पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचा अंश अधिक प्रमाणात आढळून आल्यास असे पाणी लहान मुलांच्या, गर्भवती महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत गंभीर आजार निर्माण करू शकते. यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. तसेच या पाण्यापासून आरोग्यास धोका निर्माण होतो. असे पाणी पिणे योग्य नसते. नायट्रेटमुळे मानवी शरिरात एका प्रकारे विष तयार होऊन त्यातून आरोग्याच्या विविध गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचे असे भूजल विभागाच्या तज्ज्ञांनी सांगितले.

क्षार, पीएच आणि टीडीएसचे प्रमाण वाढते
भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाणी तपासणीत जिल्ह्यातील राहाता, कोपगरगाव, संगमनेर आणि अकोले तालुक्यातील पाण्यातील क्षार (हार्डनेस) पीएच आणि टीडीएसचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. पाण्यातील वाढत्या क्षाराचे परिणाम मानवाच्या किडनी त्वचेवर होतांना दिसत आहे. यासह अनेक ठिकाणी सल्फेड यासह पाण्यातील घातक घटकांची वाढ होतांना दिसत आहे.

या ठिकाणीहून पाणी घेतात तपासणीसाठी
भूजल विभागाची केडगाव नगरला अत्याधूनिक प्रयोग शाळा आहे. यासह काही तालुक्याच्या ठिकाणी अशी प्रयोग शाळा असून या प्रयोग शाळेत वर्षातून दोनदा मान्सूनपूर्व व मान्सूनपश्चात पाणी नमुने तपासणी करण्यात येतात. हे पाणी नमुने खुल्या विहीरी, हातपंप, पाटपाणी असणारे स्त्रोत, तळ्याच्या लगत पुष्टभागावर असणार्‍या विहीरींच्या पाण्यातून घेण्यात येता.

नायट्रेट वाढीची कारणे
वाढत्या युरियाच्या वापरासह पाणी स्त्रोत असणार्‍या भागात अथवा गावात मानवी विष्टा (हागणदारी मुक्तीची अंमलजावणी न होेणे), मृत जनावरांचे अवशेषाचे प्रमाण वाढणे, उन्हाळ्यात पाणी पातळी कमी झाल्याने नायट्रेट वाढत असल्याचे निरिक्षण भूजल विभागाचे आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीत वाढत्या युरिया खतासह अन्य खतांचे वाढलेले प्रमाण हे देखील भूगर्भातील पाणी अथवा पाण्याच्या स्त्रोतात वाढलेल्या नायट्रेटच्या प्रमाण वाढीस कारणीभूत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...