अहिल्यानगर (प्रतिनिधी)
चोरीचे सोने विकत घेतल्याने सोनाराला अटक न करण्यासाठी 70 हजार रूपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर लाच मागितल्याचा गुन्हा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात शुक्रवारी (23 मे) दाखल झाला. भाऊसाहेब गोविंद काळे असे गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
दरम्यान, काळे हे वर्षभरापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत असताना त्यांनी सोनाराकडे लाच मागितली होती. त्यावेळी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. लाचलुचपत विभागाने तब्बल एक वर्षानंतर हा गुन्हा दाखल केला आहे. वर्षभर गुन्हा दाखल का झाला नाही याची उलटसुलट चर्चा पोलीस दलात रंगली आहे. काळे हे पूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत नेमणुकीस होते. तात्कालीन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांची मे 2024 मध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर ते जुलै 2024 मध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाले व नंतर दिर्घकालीन रजेवर गेले आहेत, अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली.
दरम्यान, काळे हे स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्र. 569/2024 या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान एका सोनाराने चोरीचे सोने विकत घेतल्याची माहिती समोर आली. या आरोपाखाली काळे यांनी त्या संबंधीत सोनाराकडे गुन्ह्यात अटक न होण्यासाठी सोन्याच्या रिकव्हरी ऐवजी 70 हजार रूपयांची लाच मागितली. तशी तक्रार संबंधीत सोनाराच्या भावाने 9 मे 2024 रोजी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली होती.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. या पडताळणीत काळे यांनी पंचासमक्ष लाच मागणी केल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात घडला असल्याने तब्बल वर्षभरानंतर लाचलुचपत विभागाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात शुक्रवारी (23 मे) गुन्हा दाखल केला. पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छाया देवरे, अंमलदार सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड, रवी निमसे, बाबासाहेब कराड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
नवीन अधीक्षक येताच गुन्हा दाखल
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काळे हे स्थानिक गुन्हे शाखेत असताना हा लाच मागणीचा प्रकार घडला. त्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. ते एमआयडीसी पोलीस ठाण्यात जुलै 2024 रोजी हजर देखील झाले. मात्र दिर्घकालीन रजेवर गेले. ते अजून देखील रजेवरच आहे. रजा कालावधीत ते स्थानिक गुन्हे शाखेसाठी काम करत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी ‘यंत्रणा’ काम करत होती. मात्र पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बदली झाली आणि यंत्रणेने हात झटकले. सोमनाथ घार्गे नवीन अधीक्षक म्हणून आले. ते पदभार स्वीकारत असताना काळे यांच्यावर भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे काळे यांच्यावर आत्ताच का गुन्हा दाखल झाला याची चर्चा पोलीस दलाल रंगली आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काळे स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ते तपास करत असताना त्यांनी लाचेची मागणी केली होती. त्यावेळी माझ्याकडे लाचलुचपत विभागाचा पदभार नव्हता. पण गुन्हा दाखल होण्यास उशीर का झाला याचा तपास केला जाईल.
– अजित त्रिपुटे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत विभाग, अहिल्यानगर.