Saturday, June 20, 2026
HomeनगरAhilyanagar Police : अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात ट्रेनिंगवेळी हँडग्रेनेड हातात फुटला, चार जण...

Ahilyanagar Police : अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात ट्रेनिंगवेळी हँडग्रेनेड हातात फुटला, चार जण जखमी

अहिल्यानगर । प्रतिनिधी

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरू असलेल्या सुरक्षा तयारीदरम्यान सोमवारी (25 मे) सकाळी येथील पोलीस मुख्यालयात दंगल नियंत्रणाच्या मॉक ड्रिलमध्ये गंभीर दुर्घटना घडली. गॅस हँडग्रेनेडचा हातातच स्फोट झाल्याने चार पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, त्यापैकी दोघांच्या हाताच्या करंगळ्या तुटल्या आहेत. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून, घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

शहरातील पोलीस मुख्यालयात सोमवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास दंगा नियंत्रण पथक आणि शीघ्र कृती दलाचा संयुक्त सराव सुरू होता. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जमाव नियंत्रण आणि दंगल परिस्थिती हाताळण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी स्मोक गॅस ग्रेनेड हाताळण्याचे प्रात्यक्षिक सुरू असताना अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत पोलीस कर्मचारी शिवराज संजय पवार, शुभम पांडूरंग कावरे, योगेश गणेश सोळुंके आणि गणेश मधे हे जखमी झाले. यापैकी दोघांच्या हाताच्या करंगळ्या तुटल्या असून, एका कर्मचार्‍याच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. चौथ्या कर्मचार्‍याला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.

दरम्यान, घटनेनंतर उपस्थित पोलिसांनी तत्काळ जखमी कर्मचार्‍यांना खासगी रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून तुटलेल्या करंगळ्या पुन्हा जोडण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेनंतर पोलीस दलातील प्रशिक्षण पध्दती आणि सुरक्षाविषयक नियमांबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. जखमी कर्मचार्‍यांना गॅस ग्रेनेड हाताळण्याचा पुरेसा अनुभव नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. योग्य दक्षता न घेतल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

लिव्हर सुटल्याने काही सेकंदांत स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणादरम्यान गॅस ग्रेनेडची पीन काढल्यानंतर त्यावरील लिव्हर घट्ट पकडून ठेवणे आवश्यक असते. मात्र, सरावादरम्यान संबंधित कर्मचार्‍यांच्या हातातून लिव्हर पट्टी सुटल्याने काही सेकंदांतच ग्रेनेडचा हातात स्फोट झाला. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटाच्या तीव्र धक्क्यामुळे कर्मचारी जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दंगल नियंत्रण आणि जमाव विसर्जनासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली होती. सरावादरम्यान गॅस ग्रेनेडची पीन काढल्यानंतर लिव्हर चुकून सुटल्याने स्फोट झाला. यात दोन कर्मचार्‍यांच्या करंगळ्यांना गंभीर दुखापत झाली असून इतर दोघेही जखमी झाले आहेत.
– उमेश परदेशी, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय.

ताज्या बातम्या

Pawanraje Nimbalkar Case : पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल खासदार ओमराजेंच्या विरोधात;...

0
मुंबई | Mumbai गेल्या २० वर्षांपासून चाललेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी गृहमंत्री...