अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर- पुणे रस्त्याने भरधाव वेगात जाणार्या मालट्रकने पुढे चाललेल्या चारचाकी वाहनास पाठीमागून कट मारल्याने चारचाकी वाहन पलटी झाले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चौघे जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (17 डिसेंबर) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास चास (ता. नगर) घाट येथे घडली. अहिल्यानगर- पुणे रस्त्याने भरधाव वेगात जाणार्या मालट्रक (एमएच 17 एझेड 5274) वरील चालकाने पुढे चाललेल्या चारचाकी वाहनास पाठीमागून कट मारल्याने चारचाकी वाहन पलटी झाले.
या अपघातात अमोल यशवंत देवधर यांचा मृत्यू झाला तर वाहनातील सुमित नारायण राडीकर, योगेश जोशी, रूई राडीकर व मृण्मयी देवधर (सर्व रा. छत्रपती संभाजीनगर ) हे जखमी झाले आहेत. अपघात होताच ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळाजवळील नागरिकांनी जखमींना तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात जखमी सुमित वाडीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.