अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
यंदा मे महिन्यात नगर जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा बसला असून नगर दक्षिणेतील अनेक तालुक्यांत धुव्वाधार पावसामुळे गावागावांतील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले असून तलाव, बंधारे तुडूंब भरून वाहू लागले आहेत. या पावसामुळे यंदा खरीप पेरणीपूर्व मशागतीची पंचायत झाली असून शेतकरी वर्ग आताच पेरण्या कराव्यात की पावसाची आणखी वाट पाहावी, अशा द्विधा परिस्थितीत दिसत आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री उशीरा ते रविवारी सांयकाळपर्यंत पारनेर, पाथर्डी, कर्जत आणि नगर तालुक्यात पावसाने धुव्वाधार हजेरी लावली आहे. श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर, नेवासा तालुक्यात काल भीज पाऊस सुरू होता. अकोलेच्या काही भागात जोरदार पाऊस कोसळत होता. नगर जिल्ह्यात उन्हाळ्यात उन्हाचा चटका कामालीचा वाढला होता. उन्हाचा तडाखा अंतिम टप्प्यात असतांना मे महिन्यांच्या सुरूवातीपासून भाग बदलत अवकाळी पावसाचा तडाखा सुरू झाला. सुरूवातील अनेक तालुक्यात वादळी पावसाच्या तडाख्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून कधी संततधार तर कधी जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे.
नगर दक्षिणेतील पारनेर, पाथर्डी, कर्जत, श्रीगोंदा आणि नगर तालुक्यात या पावसाचे प्रमाण अधिक असून अनेक ठिकाणी मे महिन्यांत 100 मिली मीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर, कोपरगाव, राहाता दरम्यान, या पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत हजारो शेतकर्यांचे नुकसान झालेले असून महसूल आणि कृषी विभागाकडून पिकांचे पंचनामे करण्यात येत आहे. दररोज पडणार्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसानीचा आकडा दररोज वाढतांना दिसत आहे. त्यातच शनिवारी रात्री ते रविवारी सायंकाळपर्यंत पावसाचे प्रमाण वाढत असून राज्यात मान्सूनचे आगमनाचे वृत्त धडकले आहे. दरम्यान, हवामान खात्याने आणखी काही दिवस पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे जिल्ह्यात विशेष करून नगर दक्षिणेत पेरणीलायक पाऊस झालेला असला तरी शेतकर्यांनी पिकांच्या पेरणीसाठी घाई करू नयेत, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले. रविवारी सायंकाळपर्यंत पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा आणि नगर तालुक्यात दमदार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली होती. रात्री उशीरापर्यंत अनेक भागात हा पाऊस कोसळत होता.
कपाशी लागवड सुरू
जिल्ह्यात अनेक तालुक्यात कपाशी लागवडी सुरू झाल्या आहेत. कपाशीवरील बोंडअळीचा बंदोबस्त व्हावा, यासाठी यंदा 1 जूननंतर कपाशी लागवड सुरू करण्यात यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. यासाठी कपाशी बियाणांची 15 मेनंतर विक्री सुरू केली होती. मात्र, शेतकर्यांनी कृषी विभागाचा सल्ला धाब्यावर बसवून कपाशी लागवड सुरू केली आहे.
महामार्गावर चक्काजाम
रविवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे नगर- मनमाड रोडवर राहुरी ते विळद बायपास, नगर- पुणे मार्गावर सुपा ते शिक्रापूर या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यातून दुचाकी व चारचाकी वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली. मार्गावर चक्काजाम मुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला समोर जावे लागले.
या मंडलात अतिवृष्टी
65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात 124 मंडलापैकी 12 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यात एकट्या श्रीगोंदा तालुक्यातील 9 मंडल आहे. (आकडे मिलिमीटरमध्ये) श्रीगोंदा- 87, काष्टी- 72.3, मांडवगण- 97.5, बेलवंडी- 139, पारगाव- 78.5, कोळगाव- 110.3, लोणीव्यंकनाथ 97, भानगाव- 72.8, आढळगाव- 72.8. नगर तालुक्यातील रुईछत्तीशी- 92.3, कर्जत तालुक्यातील कुंभळी- 80.3, भाबोरा- 78.