अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गेल्या 13 सप्टेंबरपासून नगरसह राज्यातील बहुतांशी भागात अतिवृष्टीने दाणादाण उडाली आहे. विशेषतः मराठवाड्यासह लगतच्या नगर जिल्ह्यातील दक्षिणेतील तालुक्यात शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होवून पूराच्या पाण्यामुळे हजारो नागरिकांना स्थलांतर करावे लागले. आता बहुतांश भागात पाऊस आणि पूर ओसरला असला तरी पुन्हा नगर जिल्ह्यात ऑक्टोबरला पावसाचा यलो अर्लट हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे. यामुळे शेतकर्यांसह सर्वांची काळजी वाढली आहे.
दरम्यान, नगर जिल्ह्यात अकोले तालुका वगळता सप्टेंबर महिन्यांत सरासरी कितीतरी अधिकपटीने पावसाची नोंद झाली असून यामुळे पावसाळ्यातील सर्व तालुक्यातील सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 14 तालुक्यात 131.3 टक्के पावसाची नोंद झाली असून यात सर्वाधिक पाथर्डी तालुक्यात 194.5 टक्के पाऊस झालेला आहे. यंदा सर्वाधिक पाऊस हा 13 ते 29 सप्टेंबरदरम्यान झालेला आहे. या पावसामुळे प्राथमिक माहितीनूसार खरीप हंगामातील पिकांना 1 हजारांहून अधिक गावांना फटका बसला आहे. यात मनुष्य, पशूहानी, घरांची पडझड, रस्ते, पूल वाहून गेलेले आहेत. जादाच्या पावसामुळे शेती जमीनीचे नुकसान, जलसंधारणाच्या कामांची हानी असे मोठे नुकसान झालेले आहे. सोमवार 29 सप्टेंबरपासून पावसाचा जोर कमी झाला असून सुर्यदर्शन सुरू झाले आहे. आता पाऊस कमी होईल, अशा आशेवर असणार्या सर्वांसाठी पुन्हा धडकी भरवणारा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी वर्तवाला आहे.
बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून पुढील चार दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट हवामान विभागाने दिले आहे. यात 3 ऑक्टोबरपासून अनेक ठिकाणी पावसाचे अंदाज असून पुन्हा नगरसह विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 1 ऑक्टोबरला रत्नागिरी व सातारा घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. 2 ऑक्टोबरला मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड लातूर जिल्ह्यांना जोरदार पावसाची शक्यता असून उर्वरित मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा ,गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तसेच रत्नागिरी व सातारा घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट आहे. 3 आणि 4 ऑक्टोबरला अहिल्यानगर जिल्ह्यासह बीड, परभणी, हिंगोली नांदेड व लातूर आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट इसून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नगरचा तालुकानिहाय पाऊस
अहिल्यानगर 130 टक्के, पारनेर 125.5 टक्के, श्रीगोंदा 137 टक्के, कर्जत 149 टक्के, जामखेड 143.3 टक्के, जामखेड 169.7 टक्के, पाथर्डी 194.5 टक्के, नेवासा 159.5 टक्के, राहुरी 100 टक्के, संगमनेर 96.3 टक्के, अकोले 91.4 टक्के, कोपरगाव 100 टक्के, श्रीरामपूर 104.9 टक्के आणि राहाता 115.5 टक्के पाऊस झालेला आहे.




