Sunday, April 6, 2025
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगर शहरात जुन्याच मार्गावरून रामनवमी मिरवणूक

Ahilyanagar : अहिल्यानगर शहरात जुन्याच मार्गावरून रामनवमी मिरवणूक

तगडा बंदोबस्त || मार्गावर चित्रीकरण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

श्रीराम नवमीनिमित्त नगर शहरात हिंदुत्ववादी संघटनातर्फे मिरवणूक काढण्यात येते. ही मिरवणूक आशा टॉकिज चौकातून नेण्याची मागणी संघटनांनी केली. मात्र, पोलिस प्रशासनाने त्यांना परवानगी दिलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून ज्या मार्गाने मिरवणूक जाते, त्याच मार्गाने मिरवणुकीला परवानगी देण्यात आली. दरम्यान, पोलिस प्रशासनाने बंदोबस्तासाठी चौका-चौकात फिक्स पाईंट केले असून, ड्रोन, सीसीटीव्ही, व्हिडिओद्वारे मिरवणुकीचे चित्रीकरण करण्यात येणार असून 536 पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.

- Advertisement -

रविवारी (दि. 6) श्रीराम नवमीनिमित्त शहरातून सकल हिंदू समाज, विविध हिंदुत्वावादी संघटनांतर्फे श्रीराम नवमीनिमित्त प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी चार मंडळांनी परवानगी घेतली आहे. दरम्यान, माळीवाडा, पंचपीर चावडी, आशा टॉकीज, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापड बाजार चितळे रोड अशा मार्गाने मिरवणूक काढण्यात येईल, अशी भूमिका संघटनेतर्फे घेण्यात आली आहे. परंतू, पोलिस प्रशासनाने 2015 मध्ये मिरवणुकीत दंगलीची घटना घडल्याने जिल्हाधिकारी यांनी मिरवणूक मार्ग बदलून माळीवाडा, पंचपीर चावडी, जुना मंगळवार बाजार, बॉम्बे बेकरी, चाँद सुलताना हायस्कूल, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापड बाजार असा मार्ग दिला होता. त्याच मार्गाने 2017, 18, 19, 22, 23 मध्ये मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे याच मार्गाने मिरवणूक निघेल अशी ठाम भूमिका पोलिस प्रशासनाने घेतली आहे. मात्र, हिंदुत्ववादी संघटना पहिल्या वर्षीच्या मार्गासाठी आग्रही आहेत. त्यामुळे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

आमदार संग्राम जगतापही पहिल्याच जुन्या मार्गासाठी आग्रही आहेत. मिरवणूक मार्गाची पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पाहणी केली असून, मिरवणूक मार्गावरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला. अपर पोलिस अधीक्षकांसह सुमारे 35 अधिकारी व 600 पोलिस कर्मचार्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावर ड्रोन कॅमेर्‍यांद्वारे नजर ठेवली जाणार असून मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी व्हिडिओ कॅमेरे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याचबरोबर चौका-चौकात फिक्स पाईंट नेमण्यात आले आहेत. त्यामुळे मिरवणुकीत उद्या काय होणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मिरवणुकीदरम्यान अपर पोलिस अधीक्षक 1, उपअधीक्षक 2, निरीक्षक 7, उपनिरीक्षक 25, अंमलदार 500 आणि एसआरपी फ्लाटुन 1 यांचा समावेश आहे.

मिरवणूक मार्ग नो व्हेईकल झोन
मिरवणूक मार्गावर अनेक चौकामध्ये स्टेज टाकून व ध्वनिक्षेपक लावून श्रीराम जयंतीत्सव साजरा करण्यात येणार आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. आजच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीक सामील होणार आहेत. या नागरीकांचे सुरक्षिततेस सार्वजनिक वाहतुकीमुळे धोका निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्या करीता मिरवणुकीचे मार्गावरील वाहतुकीचे विनीयमन करणे आवश्यक असल्याने पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी मिरवणुकीचा मार्ग नो व्हेईकल झोन जाहीर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, इम्पेरिअल चौक माळीवाडा वेस, पंचपीर चावडी, बॉम्बे बेकरी चौक- चाँद सुलताना हायस्कुल माणिक चौक भिंगारवाला चौक, कापडबाजर, तेलीखुंट, नेता सुभाष चौक -चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट या मार्गावर हा झोन लागू असणार आहे.

222 जण हद्दपार
श्रीराम नवमी मिरवणुकीत 2015 मध्ये दंगल झाली. त्यावेळी मिरवणुकीसाठी परवानगी घेतली नव्हती, असे पोलिस प्रशासन सांगत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था नियंत्रित रहावा, यासाठी पोलिस व प्रांताधिकार्यांनी शहरातील सुमारे 222 जण एक दिवसाकरिता हद्दपार केले आहेत. त्याच्याविरुद्ध गंभीर तर हिंदू-मुस्लिम असे जातीय गुन्हे आहेत. त्यात तोफखाना 88, कोतवाली 74, भिंगार कॅम्प 60 जणांचा समावेश आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : आदिवासी महिलेच्या घरात घुसून मारहाण, तोडफोड, जातीवाचक शिवीगाळ...

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका आदिवासी महिलेच्या घरात घुसून सामानाची तोडफोड करून जातीवाचक शिवीगाळ, विनयभंग, मारहाण केल्याप्रकरणी 19 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी, पोस्को,...