अहिल्यानगर (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील १ हजार २२३ ग्रामपंचायतीचे पुढील पाच वर्षांसाठी तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात करण्यात आले आहे. सर्वसाधारण आणि अन्य प्रवर्गाचे तहसीलस्तरावर गावनिहाय आरक्षण २३ एप्रिल तर उपविभागीय पातळीवर महिला सरपंच आरक्षण २४ व २५ एप्रिल रोजी निश्चित केले जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ६२५ ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज राहणार आहे. तर ९६ ग्रामपंचायतीमध्ये २०२१ ला आरक्षण काढण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी जुनेच आरक्षण कायम राहणार आहे.
जिल्ह्यातील पुढील पाच वर्षासाठीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जाहीर केला आहे. यात जिल्ह्यातील १४ तालुक्यातील सर्वसाधारण आणि अन्य प्रवर्गाचे तहसीलस्तरावर गावनिहाय आरक्षण २३ एप्रिल रोजी अंतिम केले जाणार आहे. तर २४ एप्रिल रोजी उपविभागीय कार्यालयात अकोले २४, जामखेड ३०, श्रीरामपूर २७, कोपरगाव ३८, शेवगाव ४८, श्रीगोंदा ४४, नगर ५४ ग्रामपंचायतीसाठी महिला आरक्षण सोडत होणार आहे. २५ एप्रिल रोजी संगमनेर ७३, कर्जत ४७, राहुरी ४३, राहाता २६, पाथर्डी ५५, पारनेर ५८, नेवासा ५८ ग्रामपंचायतीसाठी महिला आरक्षण निश्चित होणार आहे.
जिल्ह्यातील १ हजार २२३ ग्रामपंचायतींपैकी ६२४ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सरपंच होण्याची संधी आहे. यात ३१२ ठिकाणी महिला आरक्षण आहे. ३३० ठिकाणी ओबीसीसाठी सरपंच पदाचे आरक्षण असून, यात १६९ महिलांना संधी आहे. ११९ ठिकाणी एसटी आरक्षण असून, यात ६२ ठिकाणी महिला आरक्षण आहे. तसेच १५० ठिकाणी एससी आरक्षण असून, यात ७८ महिला सरपंचांचा समावेश आहे. जिल्ह्यात खुल्या प्रवर्गात ६२४ सरपंच निघणार असून या ठिकाणी३१८ ठिकाणी महिलांना सरपंच होण्याचा मान मिळणार आहे. जानेवारी २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या ९६ ग्रामपंचायतीकरिता सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले होते. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आरक्षणानुसार न झाल्याने ते आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. उर्वरित १ हजार २२३ ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत होणार आहे.
सोडतीचा अहवाल सादर करा
जिल्ह्यात २३, २४ आणि २५ एप्रिलला काढण्यात येणाऱ्या सरपंच आरक्षणाचा अहवाल २५ तारखेला दुपारपर्यंत नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आदेश डॉ. आशिया यांनी काढले आहेत.