Sunday, May 10, 2026
HomeनगरAhilyanagar News : साडेचार हजार शाळा 'गॅस' वर

Ahilyanagar News : साडेचार हजार शाळा ‘गॅस’ वर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

युध्दामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या फटक्याची व्याप्ती आता वाढतांना दिसत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देणाऱ्या शाळांना गॅस टंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. या शाळांमधून एकट्या नगर जिल्ह्यात ४ लाख ४६ हजार ८७७ विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येत असून गॅस टंचाईमुळे या विद्यार्थ्यांचा आहाराचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी पोषण आहार शिजवणाऱ्या शाळा आणि बचत गटांना प्राधान्यांने घरगुती गॅसचा पुरवठा करण्याचे पत्र प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र, पुणे यांनी भारत पेट्रोलियम, हिंदूस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल कंपनीला दिले आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात पहिले ते आठवीपर्यंत ४ हजार ५३७ शाळांमधून ४ लाख ४६ हजार विद्यार्थ्यांना दररोज पोषण शक्ती अभियानातून पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. हा आहार शिजवण्यासाठी शहरी भागात बचत गट तर ग्रामीण भागात स्थानिक महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या महिलांना शासनाच्यावतीने घरगुती गॅस टाक्यांचा पुरवठा करण्यात येतो. साधारणपणे १०० पर्यंत विद्यार्थ्यांचा पट असणाऱ्या शाळांना दर महिन्यांला दररोज दोन गॅसच्या टाक्या तर १ हजार अथवा त्या पुढे पट असणाऱ्या शाळांना दर महिन्याला १० किंवा त्यापेक्षा अधिक गॅस सिलिंडरची गरज आहे. युध्दामुळे सध्या नगरसह राज्यात गॅस सिलिंडरची टंचाईसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळणे अवघड झालेले असून व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण पूर्णपणे थांबवण्यात आले आहे.
पोषण आहार शिजवणाऱ्या ग्रामीण भागातील शाळांना घरगुती वापरातील गॅस सिलिंडर तर शहरी भागातील शाळांमधील महिला बचत गटांना व्यावसायिक गॅस टाक्या देण्यात येतात. मात्र, सध्या परिस्थिती या दोनही गॅसच्या सिलिंडर मिळणे अवघड झालेले आहे. अशा परिस्थितीत शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अडथळा निर्माण होवून नयेत, यासाठी त्यांना प्राधान्याने राज्यातील सर्व शाळांना तातडीने घरगुती गॅसचा पुरवठा करण्याच्या सुचना पत्राव्दारे प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र, पुणे यांनी केल्या आहेत.

नगरला महिन्यांला सात हजार सिलिंडरची गरज

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेत दर महिन्यांला राज्यात ग्रामीण व शहरी भागात स्वंपाकगृहांना साधारणपणे १.६० ते १.७० लाख एलपीजी गॅस सिलिंडरची गरज आहे. नगर जिल्ह्यात दर महिन्यांला ७ हजार गॅस सिलिंडरची गरज आहे. त्या उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पोषण आहार योजनेचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे.

शाळा संख्या व विद्यार्थी

अकोले ४५८ शाळा व २७ हजार २९७ विद्यार्थी, संगमनेर ४६३ शाळा व ४७ हजार २३१ विद्यार्थी, कोपरगाव २२२ शाळा व २९ हजार १५९ विद्यार्थी, राहाता २०९ शाळा व २९ हजार ४०६ विद्यार्थी, श्रीरामपूर १८७ शाळा व २८ हजार १०५ नेवासा ३१८ शाळा व ३९ हजार ४९२ विद्यार्थी, शेवगाव २६९ शाळा व २५ हजार १३९ विद्यार्थी, पाथर्डी ३४४ शाळा व २५ हजार १३९ विद्यार्थी, कर्जत ३१६ शाळा व २४ हजार ५५ विद्यार्थी, जामखेड १९९ शाळा व १७हजार ३४२ विद्यार्थी, श्रीगोंदा ४३१ शाळा व ३० हजार ८८५ विद्यार्थी, पारनेर ३९२ शाळा व २४ हजार ८६९ विद्यार्थी, नगर २८१ शाळा व ३० हजार ३७९ विद्यार्थी, मनपा १३५ शाळा व ३६ हजार ३५२ विद्यार्थी असे आहेत.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात आणखी एक भोंदूबाबा गजाआड

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur तंत्र मंत्राच्या साह्याने उतारे काढून जडीबुटी खाण्यास देऊन सुमारे 15 ते 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांनी तालुक्यातील पूर्व भागातील...