Wednesday, February 4, 2026
Homeनगरउत्तम जिंदगीच्या तरतुदीमुळे शिक्षक सभासंदाच्या खिशाला कात्री !

उत्तम जिंदगीच्या तरतुदीमुळे शिक्षक सभासंदाच्या खिशाला कात्री !

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत रिकाम्या खुर्च्या व विरोधकांची दांडी

अहिल्यानगर।प्रतिनिधी|Ahilyanagar

सहकारी संस्था डब्यात गेल्यास सभासदांच्या ठेवी परत करता याव्यात, यासाठी सहकार खात्याने सहकारी उत्तम जिंदगीच्या रुपयाने निधीची तरतूद करण्याचे फरमान काढले आहे. या नव्या आदेशामुळे माध्यमिक शिक्षक सोसायटीला नफ्यातून 2 कोटी 47 लाखांची तरतूद करावी लागली. याचा थेट परिणाम शिक्षकांच्या लाभांशावर झाला असून यंदा माध्यमिक शिक्षक सोसायटीकडून शिक्षक सभासदांना केवळी 6 टक्केच लाभांश मंजूर करता आला. दरम्यान, यंदाचे आता राहुन द्या, कायद्याने उत्तम जिंदगीसाठी तरतूद सक्तीची केली आहे. यामुळे पुढील वर्षी जादा लाभांश मिळवून देवू असे आश्वासन सोसायटीच्या सत्ताधारी स्वाभिमान परिवर्तन मंडळाच्या नेत्यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

या सर्वसाधारण सभेवर विरोधी पुरोगामी मंडळाकडून बहिष्कार टाकण्यात आल्याने सभास्थळावरील मंगल कार्यालयात सभेसाठी ठेवण्यात आलेल्या एकूण खुर्च्यांपैकी 40 टक्क्यांहून खुर्च्च्या रिकाम्याच असल्याचे दिसून आले. यावेळी सत्ताधार्‍यांना जाब विचारण्यासाठी विरोधक नसल्याने काही सभासदांच्या सुचनानंतर सर्व विषय मंजूरीला टाकत अवघ्या सव्वा तासात ही सभा आटोपती घेण्यात आली. यावेळी विरोधी मंडळ असणार्‍या पुरोगामी मंडळाने सभेकडे पाठ फिरवल्याने सत्ताधारी मंडळाचे काम सोपे झाले. माध्यमिक शिक्षक सोसायटीची 82 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नगरमध्ये पार पडली.

YouTube video player

दुपारी 1 वाजता नगरमधील एका लॉनमध्ये सभेच्या कामकाजाला सुरूवात झाली. यावेळी संचालक सुधीर कानवडे यांनी स्वागत केल्यावर चेअरमन शिंदे यांनी सभेचे प्रस्ताविक केले. यात यंदा सोसायटीची सभा घेण्यास उशीर झाला. यापुढे शाळा सुरू होताच जूनअखेर सर्वसाधारण सभा घेण्यात येईल. मागील वर्षी 400 सभासद सेवानिवृत्त झाल्याने त्यांना देण्यात येणारा कृतज्ञता निधीची रक्कम 23 हजारांवरून 17 हजार करण्यात आली. यामुळे नवीन कृतज्ञता निधीचा विषय सभेत मांडण्यात आला. तसेच मयत सभासदांचे 2 कोटी 91 लाखांचे कर्ज माफ केले. सहकारच्या आदेशानूसार संस्थेच्या उत्तम जिंदगीसाठी 2 कोटी 47 लाखांची तरतूद करावी लागली. याचा परिणाम थेट नफ्यावर झाला असून यामुळे सभासदांना 6 टक्केच लाभांश देता आल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. त्यानंतर मागील सभेच्या इतिवृत्ताचा विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आला.

सभेत दहा विषयपत्रिकेवर मंजूरीसाठी होते. यावेळी संचालक बाबासाहेब बोडखे यांनी पुढील 25 वर्ष आदर्श ठरेल असा कारभार करणार असल्याचा विश्वास व्यक्त करत 2024-25 च्या ताळेबंद व नफातोटा पत्रक मंजूर करून नफा वाटणीस मंजूरी द्यावी, तसेच 2025-26 च्या अंदाजपत्रक मंजूरीच्या विषयास मंजूरी द्यावी, असे आवाहन केले. त्यानंतर सभासद देवीदास खेडकर, संतोष कानडे, उध्दव गायकवाड, भाऊसाहेब जिवडे, भाऊसाहेब धनवटे, भाऊसाहेब खोसे, अमोल शिरसागर, रामदास जंजीरे, इस्माल शेख, संदीप पानमळ यांच्या अन्य शिक्षक सभासदांनी विविध सुचना केल्या. दुपारी एक वाजता सुरू झालेली सर्वसाधारण सभा सव्वा दोन वाजता संपली.

वर्षानूवर्षेे विरोध करणारे बनले सत्ताधारी
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या राजकारणात गेल्या 15 ते 20 वर्षापासून टोकाचा विरोध करणारे शिक्षक नेते यंदा संचालक झाल्याने, तसेच प्रमुख विरोधक असणार्‍या पुरोगामी मंडळाने सभेवर बहिष्कार घातल्याने शिक्षक सोसायटीची सभा एकाप्रकारे एकतर्फी झाल्याचे दिसून आले. संचालक मंडळाने मांडलेले सर्व विषय त्यांच्या समर्थकांनी एका दमात मंजूर केले.

40 टक्क्यांपेक्षा अधिक खुर्च्या रिकाम्याच !
नगर शहरात रविवारी झालेल्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सर्वसाधारण सभेच्या वेळी मंगल कार्यालयात मांडण्यात आलेल्या एकूण खुर्च्यांपैकी 40 टक्क्यांपेक्षा अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या. या ठिकाणी शिक्षक सभासदांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सभा सुरू असतांना आणि संपल्यानंतर देखील अनेक शिक्षकांनी सभेकडे दुर्लक्ष करत जेवणावर ताव मारल्याचे दिसून आले.

विरोधकांवर खापर फोडण्यासाठी लाभांश घटवला
शिक्षक सोसायटीत काही महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या स्वाभिमानी पुरोगामी मंडळाने मागील सत्ताधार्‍यांवर खापर फोडण्यासाठी लाभांश घटवला. मागील वर्षीच्या तुलनेत ठेवी 16 कोटींनी घटल्या. त्यासाठी नफ्यातून तब्बल साडेतीन कोटी व उत्तम जिंदगीसाठी 2 कोटी 47 लाखांची तरतूद करण्यात आली. यामुळे सोसायटीचा नफा कमी झाला असून सत्ताधार्‍यांना यातील उत्तम जिंदगीचे पैसे वाचवता आले असते. मात्र, विरोधकांवर खापर फोडण्यासाठी शिक्षक सभासदांचा लाभांश कमी करण्यात आल्याचा आरोप पुरोगामी मंडळाकडून करण्यात आला.

लेखा परिक्षणासाठी 85 लाख
दरवर्षी सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत लेखा परिक्षणाच्या फीवर करण्यात येणार्‍या वारेमाप उधळपट्टीवर टीका करण्यात येत होती. मात्र, आताच्या सत्ताधारी मंडळाने सोसायटीच्या लेखा परिक्षणासाठी यंदा देखील 85 लाखांची तरतूद केलेली आहे. तसेच ही केवळ तरतूद केलेली आहे. सर्वात कमी फी घेणार्‍यांकडून सोसायटीचे ऑडीट करण्यात येणार असल्याचे यावेळी चेअरमन शिंदे यांनी जाहीर केले. दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ 60 टक्क्यात लेखा परीक्षक उपलब्ध करू देतो, असे आवाहन माजी संचालक भिमराव खोसे यांनी संचालक मंडळाला केले आहे.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...