Saturday, April 4, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिमाखदार शिवजयंती उत्सव

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिमाखदार शिवजयंती उत्सव

घोषणांनी दुमदुमले शहर || पारंपरिक मिरवणुकीत शिवभक्तीचा जल्लोष

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

ताठ झाल्या माना…उंच झाल्या नजरा…आणि रयतेच्या राजाला दिला मानाचा मुजरा….अशा दिमाखात व उत्साहात गुरूवारी (19 फेब्रुवारी) शिवजयंती नगरमध्ये साजरी झाली. जिजाऊ वंदना आणि शिव आरतीने शिवगर्जना गगनात दुमदुमली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सकाळी भव्य पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. पोलीस बँड पथकाने सादर केलेल्या महाराष्ट्र गीताला टाळ्यांची दाद मिळाली. भगवे झेंडे घेऊन फिरणारे युवक व दुचाकीस्वार तसेच चौका-चौकात शिवपुतळ्याचे पूजन करून तेथे ध्वनीक्षेपकावर सादर होणारे शिवपोवाडे यामुळे शहरातील वातावरण शिवमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय…जय भवानी-जय शिवाजी….एकच राजा…शिवाजी राजा…रयतेचा राजा…शिवाजी राजा…अशा घोषणांनी आसमंत भारून गेला होता.

- Advertisement -

शहरातील शिवजयंती उत्सवाची सुरूवात जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सकाळी झाली. या वेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर अ‍ॅड. धनंजय जाधव तसेच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, अ‍ॅड. विश्वासराव आठरे, प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते शिव आरती करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर पोलीस बँड पथकाने महाराष्ट्र गीताने मानवंदना दिली. जिजाऊ वंदना आणि पाळणा उत्सव यामुळे वातावरण अत्यंत मंगलमय झाले. ह.भ.प. सिध्दनाथ मेटे महाराज यांच्या मंत्रोच्चाराने महापूजा झाली आणि नंतर पारंपरिक मिरवणुकीला प्रारंभ झाला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ, जिल्हा प्रशासन आणि महापालिका यांच्यावतीने पारंपरिक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमून गेलेले वातावरण शिवभक्ती, देशभक्ती आणि अभिमानाने भारावून गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावे, विद्यार्थ्यांची ऐतिहासिक वेशभूषा, गुरूजनांचा सहभाग तसेच मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचे दर्शन घडविणारे रथ हे नागरिकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभ्या असलेल्या नागरिकांनी जय शिवरायच्या घोषणा देत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

मिरवणुकीत विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, महिला मंडळ, सामाजिक संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. संपूर्ण मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजराने आणि भगव्या झेंड्यांच्या लहरीने वातावरण दणाणून गेले. आ. जगताप यांनी मिरवणुकीचे कौतुक केले. ते म्हणाले, जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पध्दतीने शिवजयंती साजरी करून इतिहास जिवंत ठेवला आहे. अशा देखाव्यांच्या माध्यमातून आपण आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवतो, असे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्या

संपादकीय : ०४ एप्रिल २०२६ – बंगालमधील झुंडशाही

0
पश्चिम बंगालमधील कालीचक येथे घडलेली घटना लोकशाही व न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारी आहे. तीन महिलांचा समावेश असलेल्या सात न्यायालयीन अधिकार्‍यांना तब्बल नऊ तास संतप्त...