अहिल्यानगर (प्रतिनिधी)
शहरातील सारडा गल्ली, गंज बाजार परिसरातील दुकानाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून एका व्यावसायिकाची ७० लाख १० हजार रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. इम्रान मुस्ताक बागवान (वय ४४, रा. पुणे, हल्ली रा. गोविंदपुरा, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आठ जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र पुरूषोत्तम सारडा, हेमलता पुरूषोत्तम सारडा, अश्विन श्रीनिवास सारडा, आशिष श्रीनिवास सारडा, आचल आशिष सारडा, श्रुती अश्विन सारडा, प्रकाश रामचंद्र बंग (रा. पुणे) आणि दिलीप जगन्नाथ बायड (रा. अहिल्यानगर) यांच्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी इम्रान बागवान हे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे बंधू वसीम यांना कापडाचा व्यवसाय सुरू करायचा असल्याने त्यांनी २०२३ मध्ये सारडा गल्ली येथे दुकान खरेदी करण्यासाठी व्यवहार सुरू केला होता. याच परिसरातील सारडा क्लॉथ सेंटर हे दुकान त्यातील कपड्यांचा माल, फर्निचर आणि इमारतीसह विक्रीस काढण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर बागबान बंधूनी संबंधितांशी चर्चा करून दुकान खरेदीचा व्यवहार निश्चित केला. व्यवहाराचे दोन वेगवेगळी नोटरी साठेखत करण्यात आले.
या व्यवहारापोटी २१ लाख रूपये आरटीजीएसव्दारे देण्यात आले. याशिवाय, यापूर्वी १० लाख रूपये दिल्याचा तसेच मुद्रांक शुल्कापोटी १४ लाख १० हजार रूपये भरल्याचा फिर्यादीत उल्लेख आहे. संबंधित मालमत्तेवर नगर अर्बन बँकेचे कर्ज होते. या कर्जाची तीन कोटी ११ लाख रूपयांची वन टाइम सेटलमेंटव्दारे परतफेड करण्याची अट व्यवहारात होती. त्यासाठी बँकेकडून आवश्यक अधिकृत कागदपत्रे मिळणे गरजेचे होते. मात्र, संबंधितांनी ही कागदपत्रे उपलब्ध करून दिली नसल्याने कर्जफेडीची प्रक्रिया पूर्ण करता आली नाही, यामुळे साठेखत देखील रद्द करण्यात आल्याचा आरोप बागवान यांनी केला आहे.
दरम्यान, बँकेतील थकीत हप्ते नियमित करण्यासाठी २५ लाख रूपये आवश्यक असल्याचे सांगून संबंधितांनी पैशांची मागणी केली. त्यानुसार २५ लाख रूपये रोख दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वेळोवेळी आरटीजीएस व रोख स्वरूपात एकूण ७० लाख १० हजार रूपये दिल्याचा दावा बागवान यांनी केला आहे.
संबंधित मालमत्ता पुढे प्रकाश बंग आणि त्यानंतर दिलीप बायड यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आल्याचे समजल्यावर बागवान यांनी त्यांना आधीच्या व्यवहाराची माहिती दिली होती. असे असतानाही मालमत्ता खरेदी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.




