अहिल्यानगर (प्रतिनिधी)
सुपा पोलीस ठाण्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरूणाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) तपास सोपवण्यात आला आहे.
तसेच या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. ज्योती गडकरी यांच्याकडे सुपा ठाण्याचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. तसेच पोलीस विभागाच्यावतीने स्वतंत्र अंतर्गत चौकशीही करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
पारनेर तालुक्यातील वाळवणे शिवारातील पवारवाडी येथे काही ग्रामस्थांनी चोरीच्या संशयावरून हितेशकुमार रवीश्वर प्रसाद (वय 26, रा. पनवेल, मूळगाव उत्तरप्रदेश) या तरूणास टोलनाक्याजवळ पकडले. त्याला बेदम मारहाण करून सुपा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याची तब्येत खालावल्याने त्याला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या तरूणास पकडल्यानंतर पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी न करता थेट ताब्यात घेतल्याचे उघड झाले आहे.
सुपा पोलीस ठाण्यात दाखल अकस्मात मृत्यू प्रकरणात मृत तरूणाने स्वतःहून रूग्णालयात जाण्यास नकार दिला होता व मला बाहेर सोडू नका, लोक मारतील, असे सांगितल्याचा उल्लेख आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सुपा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यामध्ये ग्रामस्थांनी तरूणाला मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
तरूणास पोलिसांच्या ताब्यात देताना पोलीस ठाण्यात फक्त एक-दोन कर्मचारी उपस्थित होते व ठाण्याबाहेर जमाव उभा होता, अशी माहितीही पुढे आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यपध्दतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित अधिकार्यांवर कारवाईसह सखोल चौकशीसाठी वरिष्ठ स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, गुरूवारी सुपा पोलिसांनी मृत तरूण व त्याच्या साथीदारांविरूध्द चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, शरद आबा पवार या स्थानिक व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून ही कारवाई झाली आहे. पवार यांच्या सिमेंट पाईप कंपनीत हितेशकुमारने चोरीचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.




