अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
क्षयरोग या गंभीर आजाराकडे नागरिकांचे लक्ष वेधून राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात लोकसहभाग वाढविण्यासाठी दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीही आरोग्य विभागाच्यावतीने विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे राज्यभरात व्यापक स्वरूपात जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या साडेतीन वर्षात आरोग्य विभागाच्या तपासणीत महाराष्ट्रात 7 लाख 28 हजार जणांना क्षय रोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. देशातील क्षय रोग रुग्णांच्या एकून संख्येपैकी महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्याही दहा टक्के असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
यामुळे सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत राज्यात शहरी, ग्रामीण अशा सर्व स्तरावर क्षयरोग नियंत्रणासाठी विविध उपक्रमांद्वारे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसीस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून याचा प्रसार श्वसनाव्दारे होतो. जगातील क्षयरुग्णांपैकी 25 टक्के क्षयरुग्ण हे भारतात आढळून येतात. भारतातील क्षयरुग्णांपैकी 10 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळून येतात. राज्यात 2024 मध्ये 2 लाख 30 हजार 515 क्षयरुग्ण आढळून आले आहेत. 2025 करिता केंद्रीय क्षयरोग विभागाकडून राज्यास 2 लाख 30 हजार क्षयरुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे. राज्यात जानेवारी व फेब्रुवारी 2025 दरम्यान तपासणी केलेल्या रुग्णांमध्ये 39 हजार 705 क्षयरुग्ण आढळले आहेत.
जागतिक स्तरावरील शाश्वत विकास ध्येयानुसार 2030 अखेर क्षयरोगाचे दुरिकरण करणे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने देशात राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून केंद्रिय क्षयरोग विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 7 डिसेबर 2024 ते 24 मार्चदरम्यान राज्यातील क्षयरोगासाठी अतिजोखीम असलेल्या निवडक 17 ग्रामीण जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात व 13 महानगरपालिका कार्यक्षेत्रात 100 दिवस क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान 20 मार्च 2025 अखेर राज्यात 40 हजार 471 क्षयरुग्णांचे निदान करण्यात आलेले आहे.
जागतिक स्तरावर दरवर्षी 24 मार्च हा दिवस क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यातून क्षयरोग संपविण्यासाठी 3 प्रकारात कार्यवाही करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
यात सर्व भागीदारांनी क्षयरोग संपविण्यासाठी प्रतिज्ञा घेणे. नाविण्यापूर्ण उपक्रम राबविणे, क्षयरोगविषयक सेवा सहज उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्य सेवेतील त्रुटी दुर करणे आणि प्रगतशील संशोधन करणे यासाठी निधीची तरतुद करणे. क्षयरुग्णांच्या फायद्यासाठी प्रतिज्ञेनुसार व केलेल्या तरतूदीनुसार त्यांना दर्जेदार सेवा देणे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. 2024 मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाने 35 लाख 39 हजार 941 व्यक्तींची संशयित क्षयरुग्ण म्हणून तपासणी केली. तसेच जानेवारी व फेब्रुवारी 2025 दरम्यान 7 लाख 54 हजार 611 व्यक्तींची संशयित क्षयरुग्ण म्हणून तपासणी तपासणी केली आहे.
राज्यभर संशयीत क्षयरोग बाधितांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेकडून क्षय रोगावर नियंत्रण मिळवत क्षयरोग संपवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
– डॉ. संदीप सांगळे, सहसंचालक व कुष्ठरोग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र.
निक्षय पोषण योजना
क्षयरोगाचे निदान झालेल्या व उपचाराखाली असलेल्या रुग्णांचे उपचारादरम्यान योग्य पोषण होण्यासाठी केंद्र शासनाच्या निक्षय पोषण योजनेतून दरमहा 1 हजार0 रुपये याप्रमाणे रक्कम उपचार सुरु असेपर्यत त्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने पीएफएमएसव्दारे अदा करण्यात येत आहे. 2024 मध्ये 1 लाख 60 हजार 395 व 2025 मध्ये आजपर्यंत 4 हजार 799 क्षयरुग्णांना त्यांच्या बँक खात्यात रक्कम अदा करण्यात आलेली आहे.
प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान
राज्यात प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत आतापर्यंत 13 हजार 351 निक्षय मित्रांची नोंदणी करण्यात आलेली आहे व त्यापैकी 12 हजार 790 निक्षय मित्रांनी क्षय रुग्णांना केंद्र शासनाने प्रमाणित केलेले अन्न, धान्य बास्केट प्रति क्षयरुग्ण दरमहा एक बास्केट याप्रमाणे कमीत कमी 6 महिने देण्यासाठी संमती दिलेली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 2023 पासून दरवर्षी क्षयरोग मुक्त पंचायत अभियानही राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 2023 मध्ये राज्यातील एकूण ग्रामपंचायतीपैकी 2 हजार 251 ग्रामपंचायती व 2024 मध्ये 7402 ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त करण्यात राज्य यशस्वी झालेले आहे.
चार वर्षातील स्थिती
2022 मध्ये 19 लाख 98 हजार 356 जणांची तपासणी केल्यानंतर 2 लाख 33 हजार 872 रुग्ण, 2023 मध्ये 26 लाख 22 हजार 646 तपासणी केल्यानंतर 2 लाख 23 हजार 444 रुग्ण, 202 मध्यक 35 लाख 39 हजार 941 जणांची तपासणी केल्यानंतर 2 लाख 30 हजार 515 आणि 2025 (फेब्रूवारी अखेर) 7 लाख 54 हजार 611 जणांची तपासणी केल्यानंतर 39 हजार 705 रुग्ण आढळले आहे.