अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
2025 ते 2030 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी गुरूवारी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, शेवगाव आणि नगर प्रांताधिकारी यांनी या तालुक्यातील महिला सरपंच पदाच्या सोडती जाहीर केल्या. यात श्रीगोंदा तालुक्यात 43 ठिकाणी, नगर तालुक्यात 52 ठिकाणी तर शेवगाव तालुक्यात 48 ठिकाणी महिला सरपंचपद जाहीर झाले आहे. तर जामखेड तालुक्यात तांत्रिक कारणामुळे आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. ही सोड तआज होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात पुढील पाच वर्षासाठीची आरक्षण प्रक्रिया सोडतीचा कार्यक्रम सुरू आहे. बुधवारी जिल्ह्यात तहसीलदार यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण आणि अन्य प्रवर्गातील आरक्षण सोडती पार पडल्या. त्यानंतर गुरूवार (दि.24) रोजी नगर, श्रीगोंदा आणि शेवगाव तालुक्यातील महिला सरपंच पदाच्या आरक्षण सोडती काढण्यात आल्या. जामखेड तालुक्यात हाळगाव, फक्राबाद आणि धनेगाव ग्रामपंचायतीमधील आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला. याठिकाणी वर्षभरापूर्वी आरक्षण काढण्यात आलेले होते. या ग्रामपंचायतींचा समावेश महिला आरक्षणाच्या यादीत घेण्यात आल्याचे गुरूवारी लक्षात आल्यानंतर या सोडती थांबवण्यात आल्या आहेत.
बेलापूर, नाऊर, उक्कलगाव, कारेगाव, पढेगाव, वडाळा, मालुंजा बुद्रुकमध्ये महिलाराज येणार
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण महिला, सात ग्रामपंचायतींवर ना.मा.प्र. महिला, चार ग्रामपंचायतींवर अनुसूचित जमाती महिला तर सात ग्रामपंचायतीवर अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले आहे. येथील प्रशासकीय सभागृहात प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्यासमोर महिलांसाठीचे आरक्षण जाहीर झाले. त्यांनी सरपंच पदाचे आरक्षण सर्व नियमांच्या आधारे करून ही सोडत काढली.
गळनिंब, घुमनदेव, गोंडेगाव, मातापूर, मुठेवाडगाव, नाऊर, नायगाव, सरला, बेलापूर बुद्रुक या नऊ ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. तर भामाठाण, एकलहरे, जाफराबाद, उक्कलगाव, उंदिरगाव, वांगी बुद्रुक, कारेगाव या ग्रामपंचायतीवर ना.मा.प्र. महिला वर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
अनुसूचित जमाती महिलांसाठी ब्राम्हणगाव वेताळ, रामपूर, माळेवाडी, वळदगाव या गावाच्या ग्रामपंचायतींवर आरक्षण जाहीर झाले. अनुसूचित जाती महिलांसाठी मांडवे, कुरणपूर, पढेगाव, वडाळा महादेव, निमगाव खैरी, मालुंजा बुद्रुक, लाडगाव आदी ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत.