Monday, May 12, 2025
HomeनगरAhilyanagar : 2017 ला भाजपच्या पराभवासाठी तर आता विजयासाठी संघर्ष!

Ahilyanagar : 2017 ला भाजपच्या पराभवासाठी तर आता विजयासाठी संघर्ष!

‘स्थानिक स्वराज्य’ची लढाई || निवडणुकीच्या अधिसूचनेकडे इच्छुकांचे लक्ष

अहिल्यानगर |ज्ञानेश दुधाडे| Ahilyanagar

नगर जिल्ह्यात 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रयत्न केले होते. त्याच भाजपला आता सत्तेत बसवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या एका गटाला संघर्ष करावा लागणार आहे. यामुळे यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीसह महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका चुरशीच्या होणार असून भाजप आपला करिष्मा कायम ठेवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने नगरसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 2022 पूर्वीच्या 27 टक्के ओबीसी आरक्षणानुसार घेण्यात याव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक अधिसूचना काढून चार महिन्यांत निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुक असणार्‍यांच्या नजरा आता निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेकडे लागल्या आहेत. दरम्यान यंदा 2017 च्या आरक्षणानुसारच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून काढण्यात येणार्‍या निवडणूक अध्यादेशाकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रयत्न केले होते त्याच भाजपला आता सत्तेत बसवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गटाला प्रयत्न करावे लागणार आहेत. 2017 ला झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्यात 72 गटाच्या जागांपैकी काँग्रेसने सर्वाधिक 23, राष्ट्रवादीने 18, भाजपने 14, शिवसेनेने 7 आणि नेवासा तालुक्यातील शंकरराव गडाख यांच्यासह जिल्ह्यात दहा अपक्षांनी विजय मिळवला होता. मात्र, आता यात महाविकास आघाडी म्हणून अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडली असून यातील मोठा गट फुटून तो भाजपसोबत सत्तेत गेलेला आहे. याचा मोठा परिणाम येणार्‍या जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येणार आहे. तसेच काँग्रेसमधील अनेक बडे नेते भाजपमध्ये गेलेले असून तेच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहेत. यामुळे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वेगवेगळे राजकीय चित्र आणि समीकरण पाहावयास मिळणार आहे.

दरम्यान आधी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत लागलेल्या परस्पर टोकाच्या निकालामुळे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काय होणार यासाठी या निवडणुकीच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा यापूर्वीचा जिल्ह्यातील इतिहास पाहता, जिल्ह्याने नेहमीच वेगवेगळे राजकीय प्रयोग केले असल्याचे राज्याने अनुभवले असून यंदा देखील तसे प्रयोग पुन्हा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे. 2017 च्या निवडणुकीत तत्कालीन काँग्रेसमधील नेत्या शालिनीताई विखे पाटील यांनी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सदाशिव पाचपुते यांचा 33 मतांनी पराभव केला होता. मात्र, आता विखे परिवाराला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीत भाजपला सत्तेत बसवण्यासाठी राजकीय मोट बांधावी लागणार आहे.

अशी होती राजकीय स्थिती
पाथर्डीत भाजपला तीन, राष्ट्रवादीला एक, शिवसेनेला एक जागा जिंकत पंचायत समिती ताब्यात ठेवण्यात आमदार मोनिका राजळे यांना यश आले होते. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीला दोन, भाजपला तीन तर काँग्रेसला एक जागा मिळाली. जामखेडला दोनही जागेवर भाजप विजयी झाले. शेवगावमध्ये तीन जागेवर राष्ट्रवादी व एका जागेवर स्थानिक आघाडीचा उमेदवार विजयी झाला. नगर तालुक्यात आमदार शिवाजी कर्डिले यांना धक्का देत शिवसेनेने तीन, काँग्रेसने दोन व एक जागा राष्ट्रवादीने मिळवली. कोपरगाव तालुक्यात राष्ट्रवादीने तीन व काँग्रेसने एक जागा मिळवत आमदार स्नेहलता कोल्हे यांना धक्का दिला. श्रीरामपूरमध्ये काँग्रेसला दोन व स्थानिक आघाडीला दोन जागा मिळाल्या. राहुरीत तीन जागा काँग्रेसला तर दोन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. कर्जतमध्ये राष्ट्रवादीला दोन, भाजपला दोन तर अकोल्यात राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली. नेवाशात गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाला सातपैकी पाच जागा मिळाल्या होत्या.तर एक जागा राष्ट्रवादीला तर एक जागा भाजपला मिळाली. पारनेरमध्ये राष्ट्रवादीला एक, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला एक, शिवसेनेला एक, काँग्रेसला एक जागा मिळाली. संगमनेरमध्ये तालुक्यात एक ठिकाणी अपक्ष तर आठ ठिकाणी काँग्रेस विजयी झाले होते. तर चांदेकसारे (ता. कोपरगाव) गटाची निवडणूक झाली नव्हती.

असे होते 2017 मध्ये आरक्षण
समशेरपूर सर्वसाधारण महिला, देवठाण सर्वसाधारण, धामणगाव आवारी सर्वसाधारण, राजूर सर्वसाधारण महिला, सातेवाडी सर्वसाधारण, कोतुळ सर्वसाधारण (अकोले). समनापूर सर्वसाधारण, वडगावपान सर्वसाधारण, आश्वी बु. सर्वसाधारण महिला, जोर्वे अनुसूचित जमाती महिला, घुलेवाडी सर्वसाधारण, धांदरफळ बु. नामाप्र, संगमनेर खुर्द नामाप्र, बोटा नामाप्र, साकुर सर्वसाधारण महिला (संगमनेर). सुरेगाव सर्वसाधारण, ब्राह्मणगाव सर्वसाधारण महिला, वारी अनुसूचित जाती महिला, शिंगणापूर सर्वसाधारण, चांदेकासारे नामाप्र, पुणतांबा अनुसूचित जमाती, साकुरी सर्वसाधारण महिला, लोणी बु. नामाप्र कोल्हार बु. अनुसूचित जमाती (कोपरगाव). उंदीरगाव अनुसूचित जमाती महिला, टाकळीभान अनुसूचित जमाती महिला, दत्तनगर सर्वसाधारण महिला, बेलापूर बु. सर्वसाधारण (श्रीरामपूर). बेलपिंपळगाव सर्वसाधारण, कुकाणा नामाप्र, भेंडा नामाप्र, भानस हिवरे अनुसूचित जाती महिला, खरवंडी नामाप्र, सोनई अनुसूचित जाती महिला, चांदा (नेवासा). दहिगावने सर्वसाधारण महिला, बोधेगाव अनुसूचित जाती महिला, लाडजळगाव सर्वसाधारण, भातकुडगाव अनुसूचित जाती (शेवगाव). कासार पिंपळगाव सर्वसाधारण, भालगाव सर्वसाधारण, माळी बाभुळगाव नामाप्र महिला, मिरी नामाप्र, टाकळी मानूर नामाप्र महिला (पाथर्डी). देहरे नामाप्र, जेऊर नामाप्र महिला, नागरदेवळे सर्वसाधारण, दरेवाडी नामाप्र, निंबळक सर्वसाधारण, वाळकी सर्वसाधारण महिला (नगर). टाकळीमिया अनुसूचित जमाती महिला, ब्राह्मणी अनुसूचित जमाती, सात्रळ सर्वसाधारण महिला, बारागाव नांदूर नामाप्र वांबोरी, सर्वसाधारण महिला (राहुरी). ढवळपुरी सर्वसाधारण महिला, कान्हूरपाठार, सर्वसाधारण महिला, टाकळी ढोकेश्वर नामाप्र, निघोज सर्वसाधारण, सुपा सर्वसाधारण महिला (पारनेर). कोळगाव सर्वसाधारण महिला, मांडवगण सर्वसाधारण महिला, आढळगाव सर्वसाधारण महिला, बेलवंडी सर्वसाधारण महिला. काष्टी सर्वसाधारण (श्रीगोंदा). मिरजगाव सर्वसाधारण, कोरेगाव नामाप्र महिला, कुळधरण अनुसूचित जाती, राशीन अनुसूचित जाती (कर्जत).

राजकीय बेरोजगारांच्या आशा पल्लवीत
जिल्ह्यात सात ते आठ वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर पालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यामुळे प्रत्येक तालुक्यात दुसर्‍या आणि तिसर्‍या फळीतील नेते यांना सध्या राजकीय काम करण्यास संधी नसल्याचे चित्र होते. एका प्रकारे हे सर्व नेते राजकीय बेरोजगार होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने येत्या चार महिन्यांत स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून ते कामाला लागले आहेत.

2022 मध्ये गटांची संख्या वाढवली
आठ वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 73 जिल्हा परिषद गट आणि त्याच्या दुप्पट म्हणजेच 146 पंचायत समिती गण होते. मात्र, 2021 राज्यातील महाविकास आघाडी सरकारने लोकसंख्येच्या प्रमाणात गट आणि गणाची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्याने नगर जिल्ह्यातील गटांची संख्याही 85 केली तर गणाची संख्या 170 करण्यात आली. 2022 पूर्वी जिल्हा परिषदेच्या एका गटात 50 ते 55 हजार, तर पंचायत समिती गणात 35 ते 40 हजार मतदारसंख्या होती. मात्र, 2002 मध्ये त्यात पाच ते सात हजारांची घट करण्यात येवून जिल्ह्यात गट आणि गणाची संख्या वाढवण्यात आली होती.

झेडपीतील 2017 मधील स्थिती
एकूण जागा 73 होेत्या. त्यातील 72 जागांसाठी निवडणूक झाली. यात काँग्रेस 23, राष्ट्रवादी काँग्रेस 18, भाजप 14, शिवसेना 7 आणि अपक्ष 10 असे विजयी झाले होते.

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rain News : भंडारदरात पुन्हा अवकाळी पावसाची वादळी बॅटिंग

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara गत तीन दिवसांपासून भंडारदरा धरण परिसरात अवकाळी पावसाची अधूनमधून बॅटिंग सुरू असून त्याने काल रविवारी सायंकाळीही जोरदार बॅटिंग केली. दरम्यान, शुक्रवारी रात्री...