Tuesday, March 25, 2025
Homeनगरझेडपीचे आण्णासाहेब शिंदे सभागृह अखेर जमीनदोस्त

झेडपीचे आण्णासाहेब शिंदे सभागृह अखेर जमीनदोस्त

जिल्हा परिषद प्रशासनाकडून जुन्या ऐतिहासिक इमारतीचे निर्लेखन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा परिषदेच्या अनेक वर्षाच्या सर्वसाधारण सभांचे साक्षीदार, अनेक धोरणात्मक निर्णय झालेल्या जुन्या अण्णासाहेब शिंदे सभागृह प्रशासनाने दोन दिवसांपासून पाडण्यास सुरूवात केली आहे. याठिकाणी असणारी इमारत यंत्राच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली असून साधारण वर्षभरापासून याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता याठिकाणी असणारी जुन्या सभागृहाची असणारी इमारत हटवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आली.

- Advertisement -

जिल्हा परिषदेची नूतन इमारत बांधल्यानंतर जुन्या प्रशासकीय इमारतीमधून जिल्हा परिषदेचा कारभार हा नवीन इमारतीत हलवण्यात आला. त्यापूर्वी नगर जिल्ह्याची ओळख असणार्‍या ब्रिटीशकालीन घड्याळाच्या इमारतीतून चालत होता. 1967 ला नगर जिल्हा परिषदेला पहिल्यांदा दिवंगत शंकरराव काळे यांच्या रुपाने अध्यक्षपद मिळाले. त्यानंतर काळाच्या ओघात 2019 पर्यंत नेत्यांनी नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धूरा समर्थपणे पेलली. 2022 मध्ये तत्कालीन अध्यक्षा राजश्रीताई घुले यांचा कार्यकाळ संपला आणि जिल्हा परिषदेवर प्रशासकराज आले. त्यावेळी तत्कालीन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे आणि तद्नंतर आशिष येरेकर यांच्या रुपाने नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासक म्हणून काम पाहत आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या जुन्या सभागृहातून त्या-त्यावेळचे अध्यक्ष यांनी जिल्ह्यासाठीचे धोरणात्मक निर्णय घेत जिल्ह्याला दिशा देण्याचे काम याच अण्णासाहेब शिंदे सभागृहातून केले होते. 2006 पर्यंत याठिकाणी जिल्हा परिषदेच्या दर तीन महिन्यांनी नियमित सर्वसाधारण सभा होत होत्या. मात्र, 2006 च्या शेवटी जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीत नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर खर्‍याअर्थाने जुन्या सभागृहाला उतरती कळा लागली. अलिकडच्या काही वर्षात याठिकाणी जिल्हा परिषदेचे भंगार साचून ठेवण्यात आले होते.

तत्कालीन अध्यक्षा घुले यांनी केली होती पाहणी
जिल्हा परिषदेच्या जुन्या शिंदे सभागृहाची अखेरची पाहणी 2021 मध्ये तत्कालीन अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी केली होती. त्यावेळी त्यांच्या समवेत सभापती सुनील गडाख हे देखील उपस्थित होते. अध्यक्षा घुले यांनी या सभागृहाच्या दुरूस्तीसह अन्यबाबीबाबत प्रशासनाला सुचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासकराज आले आणि पुढे प्रशासनाने या सभागृहाच्या निर्लेखनाचा विषय मंजूर करत सभागृह आणि त्याठिकाणी असणारी इमारत जमिनदोस्त केली आहे.

मंजूरीनूसार इमारत पाडली : खेडकर
जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या शेजारी असणार्‍या शिंदे सभागृहाच्या निर्लेखनाच्या विषयाला एक ते दीड वर्षापूर्वीच मंजूरी मिळाली होती. आता त्यावेळच्या मंजूरीनूसार या ठिकाणी असणारी इमारत पाडण्यात आली आहे. सध्या याठिकाणी नवीन कोणतेच बांधकाम करण्यात येणार नसल्याचे बांधकाम विभागाचे उपअभियंता आजिनाथ खेडकर यांनी सांगितले.

पार्किंगसाठी केली जागा मोकळी
जिल्हा परिषदेच्या आवारात पार्किंगचा विषय गंभीर आहे. त्यासाठी नियोजन करणे आवश्यक असताना प्रशासनाने जिल्हा परिषदेची ऐतिहासिक वास्तू असणारे अण्णासाहेब शिंदे सभागृह जमिनदोस्त केले आहे. ही इमारत केवळ इमारत नव्हती, तर जिल्हा परिषदेच्या 2006 पूर्वीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्याचे सभापती आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या आठवणींचा ठेवा होता. याच सभागृहातून जिल्ह्यासाठी दिशादर्शक निर्णय घेण्यात आलेले असताना कोणतीही चर्चा न करताच अचानक ही इमारत आणि त्याठिकाणी असणारे सभागृह जमिनदोस्त करण्यात आल्याबद्दल अनेक जुन्या सदस्य आणि पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...