Sunday, July 26, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना ‘खो’

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना ‘खो’

जनगणनेच्या कामात अडकणार कर्मचारी || वेळापत्रक रद्द

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

यंदा जनगणनेच्या कामासाठी बहुतांश जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना जबाबदारी दिल्याने यंदा होणारी जि. प. कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेने बदल्यांचे वेळापत्रकही जाहीर केले होते. मात्र जिल्हा प्रशासनाकडून जनगणनेसाठी कोण कर्मचारी आहेत, ही माहिती उपलब्ध होत नसल्याने सध्याचे वेळापत्रक रद्द करण्यात आले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने 2027 च्या जनगणनेचे देशव्यापी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत पार पडेल, तर 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना केली जाणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील जनगणना कामाशी संबंधित क आणि ड वर्ग संवर्गातील कर्मचारी तसेच सर्व जिल्हा परिषद शिक्षकांची यंदा बदली न करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाने तसे पत्र सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पाठवले आहे. जनगणना कामाशी संबंधित क आणि ड वर्ग संवर्गातील कर्मचारी तसेच सर्व शिक्षक यांची सन 2026 ची बदली प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा परिषदेने जनगणनेशी संबंधित कर्मचारी वगळून बदल्यांची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी 6 ते 8 मे दरम्यानचे वेळापत्रक जाहीर केले होते. दुसरीकडे जिल्हा परिषदेने जिल्हा प्रशासनाकडे कोणते कर्मचारी जनगणनेशी संबंधित आहेत, याची माहिती मागवली, परंतु अद्याप ही माहिती मिळाली नसल्याने जिल्हा परिषदेने जाहीर केलेले बदल्यांचे वेळापत्रक तुर्तास पुढे ढकलले आहे. तरी बदल्यांबाबतची नवीन तारीख यथावकाश कळवण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाने सर्व खातेप्रमुख, तसेच पंचायत समितीच्या अधिकार्‍यांना कळवले आहे.

नवीन वेळापत्रकाची शक्यता कमी
बदल्यांची नवीन तारीख यथावकाश कळवण्यात येईल, असे जरी प्रशासनाने म्हटले असले तरी जनगणनेचे काम जूनपर्यंत चालणार आहे. त्यामुळे यंदाच्या बदल्यांची प्रक्रिया रद्दच समजली जात आहे. जूननंतर बदल्या होतील, अशी शक्यता कमी आहे.

ताज्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खरमरीत...

0
नवी दिल्ली | New Delhi दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट परीक्षेचा (Neet Exam) पेपर फुटीच्या कारणावरून आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर...